रामनाथी,गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या आगाशीतून दिसलेले विलोभनीय सौंदर्य आणि आलेली दैवी प्रचीती
१. रामनाथी आश्रमाच्या आगाशीतून दिसणारे दृश्य वेगळ्याच लोकात घेऊन जात असणे
‘रामनाथी आश्रमातील आगाशीत थांबल्यास समोरचे दृश्य आपल्याला एका वेगळ्या लोकात घेऊन जाते. या आगाशीत देव अनेक दैवी संकेत देत असतो. आगाशीतील सगळे सौंदर्य ईश्वरानेच निर्माण केल्याची प्रचीती ते दृश्य पाहून येते.
२. आश्रम परिसरातील सात्त्विकता वाढल्याची दैवी प्रचीती देणारे पक्षी
२ अ. राजस चालीचा अलौकिक सौंदर्य असणारा गरुडपक्षी : या दैवी वातावरणात अनेक गरुड पक्षी घिरट्या घालतांना दिसतात. जिथे साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहे, तिथे तिचे वाहन तिच्या दर्शनाची वाट पहात घिरट्या घालत असते. या गरुडांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जेव्हा आकाशातून उडत असतात, तेव्हा त्यांची राजस चाल ‘तो गरुडच आहे’, हे लक्षात आणून देते. जेव्हा गरुड एखाद्या झाडावरून आकाशात भरारी मारतो, तेव्हा त्याच्या पंखाचा चॉकलेटी रंग, त्याला असलेली चॉकलेटी रंगाची किनार आणि त्याची पांढरी शुभ्र मान अन् डोके, असे भगवंताने दिलेले अलौकिक सौंदर्य दिसून येते. त्याची ती भरारी मनाला वेगळाच आनंद देते.
२ आ. भारद्वाज, तसेच इतर पक्षी यांनी दैवी संकेत देणे : गरुडाप्रमाणेच अनेक पक्षी इथे दिसतात. दैवीतत्त्व असलेला भारद्वाज पक्षीसुद्धा आपले सुंदर पंख पसरून उडतांना दिसतो. कधी पोपट उडतांना दिसतात, तर कधी कृष्णवर्णीय कांतीचा खंड्यासुद्धा दिसतो. त्या वातावरणात सतत रहायला अनेक फुलपाखरेसुद्धा आतुरलेली असतात. पिवळ्या, पांढर्या, गडद पिवळ्या रंगाची अशी विविध रंगांची फुलपाखरे या वातावरणात उडतांना दिसतात.
३. आश्रमाची सात्त्विकता वाढल्याने झालेले परिणाम
३ अ. पूर्वी दिसणार्या घारींचे प्रमाण अल्प होऊन गरुडांचे प्रमाण वाढणे : गरुडांप्रमाणेच इथे घारीसुद्धा दिसतात. आश्रमात यज्ञांचे प्रमाण वाढल्याने आश्रमाची सात्त्विकता वाढून घारींचे प्रमाण अल्प होऊन गरुडांचे प्रमाण परत वाढलेले दिसले.
४. प.पू. दास महाराज येण्याच्या वेळी आंब्याच्या झाडावर अनेक माकडे दिसणे
ज्या दिवशी पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून प.पू. दास महाराज येणार होते, त्या दिवशी आश्रमाच्या समोरच्या आंब्याच्या झाडावर अनेक माकडे दिसली. फांदीला आरामात टेकून बसणारी ही माकडे जणू महाराजांच्या येण्याचा दैवी संकेतच साधकांना देत असतात. ती माकडे दुसर्या दिवशी नव्हती.
५. आपत्काळातही ‘माझ्या भक्तांचा नाश होणार नाही’, हे भगवंताचे वचन साधकांनी स्मरणात ठेवल्याने साधकांना कसलीच भीती नसणे
या वातावरणाच्या माध्यमातून देवाने आपत्काळाचे भीषण रूपही साधकांना दाखवले. बाहेर जोरात पाऊस पडत असतांना ‘आश्रमाच्या समोरील जागेतून पाण्याची पातळी कशी वाढत आहे ?’, हे गुरुमाऊलीने पहायला सांगितले; पण ते पहातांनाही कुठल्याच साधकांच्या तोंडवळ्यावर भीती नव्हती. ते पहातांना वैकुंठाधिपतीने दिलेले वचन ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही’, हे त्यांच्या स्मरणात असायचे.
‘गुरुदेव, आश्रमाच्या आगाशीतून दिसलेले हे विलोभनीय सौंदर्य ही केवळ तुमचीच लीला आहे.’
-सौ. माधुरी नितीन ढवण
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |