आयुर्वेद : समज आणि गैरसमज
प्रश्न : आयुर्वेदाने साखरेला ‘पांढरे विष’ मानले आहे का ?
उत्तर : नाही ! आयुर्वेदात ‘इक्षुवर्ग’ म्हणजे ऊसापासून बनणार्या पदार्थांच्या गटात साखरेचा समावेश होतो. गुळावर प्रक्रिया करून साखर बनवली जात असल्याचे उल्लेख प्राचीन आयुर्वेदाच्या ग्रंथांत आहेत. याचा अर्थ साखर बनवण्याची प्रक्रिया भारतियांना फार पूर्वीपासूनच ठाऊक होती, हेही ऐतिहासिकदृष्टीने महत्त्वाचे आहे.
सिता सुमधुरा रुच्या वातपित्तास्रदाहहृत् ।
मूर्च्छाच्छर्दिज्वरान्हन्ति सुशीता शुक्रकारिणी ।।
– भावप्रकाशनिघंटु, पूर्वखंड, इक्षुवर्ग, श्लोक ३०
अर्थ : साखर ही गोड, रुची उत्पन्न करणारी, वात, पित्त आणि रक्ताचा दाह शमवणारी, चक्कर, उलटी, ताप यांत लाभदायक, थंड अन् शुक्र वाढवणारी आहे !
आजच्या काळात सल्फर वापरून गाळलेली साखर आपण नियमित वापरतो, तिला ‘फॉस्फोरिक ॲसिड’ वापरून गाळलेली साखर किंवा खांडसारी हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना नेहमीच्या साखरेने दमा वगैरे त्रास होतो, त्यांना खांडसारी उपयुक्त आहे. औषधांत वापरतांना मात्र पत्री खडीसाखरच वापरणे अपेक्षित असते. कुठे आणि कोणती गोष्ट वापरावी वा टाळावी, याचे सम्यक ज्ञान म्हणजे आयुर्वेद !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.