पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानातून हिंदु संस्कृतीविषयी जागृती !
पुणे, ६ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत ? या संदर्भात माहिती देण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी या व्याख्यानात मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला १७५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या व्याख्यानानंतर अनेक धर्मप्रेमींनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रबोधनात्मक संदेश पाठवणे, ठिकठिकाणी जागृती करणे अशा कृती केल्या. कु. चारूशीला चिंचकर यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर समितीचे श्री. पराग गोखले यांनी उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करतांना श्री. पराग गोखले म्हणाले,
१. पाश्चात्त्य ‘कलेंडर’ पद्धतीत बर्याच त्रुटी आहेत आणि आपल्या हिंदु पंचांगानुसार नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करायला हवे.
२. आपण स्वतंत्र आहोत असे म्हणतो; पण सध्या आपल्या भारत देशात कालगणना, नववर्ष इतकेच नव्हे, तर शिक्षणपद्धत आणि कायदे सुद्धा इंग्रजांचेच आहेत. हे पालटायचे असेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी आपल्या सर्वांना करायची आहे.
३.‘नासा’ने सुद्धा अंतराळ यान प्रक्षेपित करतांना एकादशीची तिथी निवडली. ‘नासा’ला हिंदु पंचांगाचे महत्त्व कळत आहे; पण आपल्या देशातील तथाकथित पुरोगामी मात्र हिंदु संस्कृतीच्या विरोधात बोलतात.
श्री. पराग गोखले यांनी ३१ डिसेंबरनिमित्त ‘संस्कृतीरक्षण चळवळी’त सगळे जण कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतात ? याविषयी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी काही धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.