तळमळीने पुढाकार घेऊन हिंदु धर्म रक्षणासाठी कृती करणारे चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमी !

‘३१ डिसेंबर’च्या निमित्ताने गडाचे पावित्र्य जपण्यासाठी चंदगड तालुक्यामध्ये पारगड या किल्ल्याच्या पायथ्याशी काही युवकांनी पुढाकार घेतला. यातील काही जण समितीच्या संकेतस्थळाचे वाचक असून ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत. – सौ. राजश्री तिवारी आणि श्री. आदित्य शास्त्री,  हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर

पारगड किल्ल्याच्या पायथ्याला एकत्र आलेले धर्मप्रेमी युवक

१. हे युवक ज्या भागांतून आले होते, तो सर्व भाग दुर्गम आहे. या वर्षी पावसामुळे तिथे शेतीसुद्धा व्यवस्थित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे समाज आणि कुटुंब अशा दोन्ही ठिकाणी या युवकांना कार्याविषयी सहकार्य नसतांना हे युवक तळमळीने कार्य करत आहेत.

२. सर्वश्री महंतेश देसाई, तेजस गावडे, विकास चव्हाण, दयानंद पाटील, सचिन पाटील एकमेकांशी चांगले जोडलेले आहेत. सर्वजण लांब रहात असूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी चांगले संघटन निर्माण केले आहे.

३. सर्वांनाच आर्थिक-कौटुंबिक अशा वेगवेगळ्या अडचणी असूनही आमच्यासमवेत २ घंट्यांच्या भेटीत कुणीही वैयक्तिक अडचणीविषयी एक शब्दसुद्धाही काढला नाही. प्रत्येक जण धर्मावर त्या भागांमध्ये कसे आघात होतात आणि ते रोखण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे ?, यांविषयी बोलत होते.

४. युवकांची धर्मरक्षण करण्याविषयीची दिशा सुस्पष्ट होती आणि कुणाकडूनही त्यांना कसलीच अपेक्षा नव्हती. हे सर्व युवक निरपेक्षपणे धर्मरक्षण करण्यास उद्युक्त होते.

५. गडाची स्वच्छता करून उन्हात सर्व युवक एकत्र जमले असता त्यांच्या तोंडावळ्यावर कंटाळा जाणवत नव्हता, तर एक वेगळेच तेज होते.

६. समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेला नामजप बहुतांश युवकांनी चालू केला आहे आणि त्यांना अनुभूतीही आल्या आहेत.

७. याच वेळी २ युवतींशी (कु. रविना गावडे आणि तिची बहीण) यांच्याशी आमचा परिचय झाला. यातील एक २१ वर्षांची, तर दुसरी १७ वर्षांची आहे. या दोन्ही युवतींना ‘लव्ह जिहाद’विषयी जी माहिती आहे,  ती त्यांच्या भागातील युवतींना सांगून त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कुठलेही मार्गदर्शन नसतांना केवळ धर्मरक्षणाच्या तळमळीपोटी त्या हे सर्व करत आहेत.

८. यातील एक ‘धर्मप्रेमी’ कु. तेजस गावडे याने ‘त्यांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि ते ‘ऑनलाईन’ बैठकीतून अधूनमधून मिळाल्याने असल्याने आम्ही सकारात्मक आहोत’, असे सांगितले.

९. समितीच्या वतीने जेव्हा ‘ऑनलाईन’ आंदोलन होते, तेव्हा हे युवक पुढाकार घेऊन गावात जागृती करून छायाचित्रे पाठवून त्यात सहभागी होतात.

१०. ‘सनातन पंचांग २०२२’ गावात पोचले, तर गावोगावी हिंदु राष्ट्राचा विचार जाईल आणि धर्मप्रसार होईल म्हणून कु. दयानंद पाटील याने पुढाकार घेऊन अन्य धर्मप्रेमींच्या साहाय्याने चंदगड तालुक्यात १०० पंचांग वितरित केले.

(धर्मकार्यासाठी तळमळीने पुढाकार घेऊन कार्य करणारे असे युवक हेच हिंदु धर्मासाठी आशास्थान आहेत ! याप्रमाणे इतरत्रच्या युवकांनीही धर्मकार्यासाठी त्यांच्या स्तरावर कृती करावी ! – संपादक)

या सर्वांना भेटल्यावर मला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘अशा प्रकारे धर्मकार्य करणारे अनेक जण आहेत, ज्यांना आपण भेटायचे आहे’, याची जाणीव होऊन अजून तळमळीने समष्टी सेवा करण्याविषयी मनात उत्साह निर्माण झाला. – सौ. राजश्री तिवारी, कोल्हापूर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक