कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व !
कोल्हापूर, ७ जानेवारी (वार्ता.) – कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. २१ पैकी ६ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित १५ जागांसाठी मतदान झाले. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर सिद्ध झालेल्या शिवसेनेच्या विरोधी पॅनेलने सत्ताधार्यांना चांगली लढत दिली. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे ११, तर शिवसेनेचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू प्राचार्य अर्जुन आबिटकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे आणि याच गटातील विद्यमान संचालक अनिल पाटील यांचा पराभव केला.
सत्ताधारी गटाकडून विद्यमान संचालिका आणि माजी खासदार निवेदिता माने, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह ‘पन्हाळा तालुका विकास संस्था’ गटातून आमदार डॉ. विनय कोरे यांनी सहज विजय मिळवला. शिवसेनेकडून खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत.