धर्मो रक्षति रक्षित: ।
धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो. धर्म म्हटले की, संप्रदाय, पंथ एवढेच डोळ्यांसमोर येते; परंतु ‘जो धारण करतो, तो धर्म’, हा धर्माचा अर्थ अपेक्षित आहे. जसे साखरेचा धर्म गोडवा आहे. साखर आणि गोडवा निराळे करता येत नाही, तसे ईश्वरनिर्मित प्रत्येकाचा धर्म निश्चित आहे.
सूर्य, चंद्र, तारे, नदी, वारा, पक्षी, झाडे आदी सगळे आपल्या धर्माच्या कक्षेत राहून जीवन जगतात. केवळ एकटा मनुष्य हाच हळूहळू स्वधर्म विसरून जगू लागला. त्याचीच शिक्षा म्हणून संपूर्ण जगात आज निर्माण झालेली ही भीषण परिस्थिती आहे. निसर्गाने जणू मानवाला आत्मपरीक्षण करण्याची ही संधी दिली आहे. त्यानुसार निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आतातरी मनुष्याने धर्मचरणाने वागावे.
पृथ्वीवर जन्माला येण्याची २ मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे प्रारब्धाचे भोग भोगून संपवणे आणि दुसरे ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे, जे भाग्य केवळ मनुष्य जन्मातच मिळते. हेच विसरून मनुष्य मान, सन्मान, पैसा यांच्या मागे धावत सुटला. मानवाने आतातरी सावध व्हावे आणि धर्माचरण करावे, तेव्हाच धर्म त्याचेही रक्षण करील !