अमेरिका-पाकिस्तान आणि चीन-पाकिस्तान यांच्यात भारतद्वेषातून झालेली मैत्री अन् त्यांची भारतावर होत असलेली दादागिरी !
१. संरक्षणसिद्धतेत शस्त्रास्त्रांचे महत्त्व लक्षात आल्याचा परिणाम म्हणजे वर्ष १९७१ चे भारत-पाक युद्धात भारताचा झालेला विजय !
‘संरक्षणसिद्धतेत शस्त्रास्त्रांना अतिशय महत्त्व असते. वर्ष १९६२ च्या युद्धातील पराभवाने भारताला हा धडा शिकायला मिळाला. यामुळे शस्त्रास्त्रांना न्यून लेखणे बंद झाले. भारताची सार्वभौमता टिकवायची असेल, शत्रू राष्ट्रांना खणखणीत उत्तर द्यायचे असेल, तेव्हा संरक्षणाविषयी कोणतीही तडजोड करता कामा नये, हे सर्वांनाच पटले होते. याचेच प्रतिबिंब वर्ष १९७१ च्या युद्धात पडले आणि भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून दणदणीत विजय प्राप्त केला.
२. अमेरिका-पाक आणि पाकिस्तान-चीन यांच्या मैत्रीचे कारण म्हणजे केवळ ‘भारतद्वेषच’ !
भारताची कुठली ना कुठली कुरापत काढणे, हा पाकिस्तानचा सततचा उद्योग आहे आणि भारताचे प्राबल्य वाढू नये; म्हणून अमेरिका सतत पाकलाच पाठिंबा देत आली आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्रीसुद्धा लपून राहिलेली नाही. या मैत्रीचे कारणही ‘भारतद्वेष’ हेच आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. भारताने अण्वस्त्रसज्ज होऊ नये, अशी अपेक्षा करणारे चीन आणि अमेरिका हे मात्र स्वत:ची अण्वस्त्रे नष्ट करण्यास सिद्ध नाहीत. महासत्तांनी पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक साहाय्य देऊन भारतावर सतत दादागिरी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सुदैवाने भारताने त्यांच्या या प्रयत्नांना दाद दिलेली नाही, ही उत्तम गोष्ट आहे.
३. सर्वंकष अण्वस्त्रचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारतावर दबाव आणणे; पण त्याने करारावर स्वाक्षरी न करण्याची भूमिका कायम ठेवणे, ही गोष्ट अभिनंदनीय !
प्रथम ‘सीटीबीटी’वर (सर्वंकष अण्वस्त्रचाचणी बंदी करारावर) भारताने स्वाक्षरी करावी; म्हणून दबाव आणला गेला. तथापि शेजारी पाक आणि चीन यांसारखी अण्वस्त्रसज्ज राष्ट्रे असतांना भारताने अण्वस्त्रे सिद्ध न करणे, म्हणजे शत्रू पुढे मान तुकवण्यासारखेच होते. जर कॅनडाकडे अण्वस्त्रे असती, तर अमेरिकेने स्वत:ची अण्वस्त्रे ‘शून्यावर’ आणली असती का ? जगात अन्य ४ अण्वस्त्रधारी देश असतांना अमेरिका असे एकतर्फी पाऊल उचलेल का ? ; पण भारताकडून मात्र त्यांची तशी अपेक्षा होती. चीन आणि फ्रान्स यांनी या करारासंबंधी वाटाघाटी चालू असलेल्या काळातही चाचण्या घेतल्या होत्या; तथापि त्याविषयी एक अवाक्षरही न बोलता ‘भारताने मात्र या करारावर स्वाक्षरी करावी’, असा घोषा अमेरिकेने लावला. भारतात गेल्या काही वर्षांत सत्तेतील पक्ष अनेकदा पालटले; पण या करारावर स्वाक्षरी न करण्याची भूमिका कायम ठेवली आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
कोणत्याही स्वाभिमानी राष्ट्र्राला आपले राष्ट्र्र्रहित अग्रक्रमाने पहावे लागते. विशेषत: शत्रू राष्ट्र्र्रे पाठीला पाठ टेकवून उभी असतांना जर काही कठोर निर्णय घेतले नाहीत, तर राष्ट्र्र्राचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.
४. भारत-पाकमध्ये सदैव तणावाची स्थिती उत्पन्न करणारे अमेरिकेतील गुप्तहेर खाते आणि प्रसारमाध्यमे !
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता नांदणे, हे अमेरिकेच्या हिताचे नाही. खरे तर यासाठीच अमेरिकेतील गुप्तहेर खाते आणि प्रसारमाध्यमे ही संगनमताने काही खोडसाळ वृत्ते पसरवत असतात. अफवा पसरवून भारत-पाक या दोन देशांमध्ये सदैव तणावाची स्थितीच उत्पन्न करून ठेवणे, हा यांचा नित्यउद्योग आहे. या उद्योगाचाच एक भाग म्हणून प्रसारमाध्यमांनी ‘भारताने पाक सीमेवर पृथ्वी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत’, असे वृत्त प्रसृत केले. ‘लाहोरपासून केवळ शंभर किलोमीटर अंतरावर ही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत’, असेही ‘वॉशिंग्टन पोस्ट’ मध्ये म्हटले होते. वस्तूत: हे वृत्त निखालस निराधार होते.
भारताने क्षेपणास्त्रे सीमेवर ठेवली म्हणजे जर शांततेचा भंग होत असेल, तर पाकिस्तानकडे चीन आणि अमेरिका यांच्याकडून वाहणार्या शस्त्रास्त्रांच्या ओघाने शांतता भंग होत नाही का ? हा दुटप्पीपणा नव्हे तर काय ?
५. भारत-पाक चर्चा चालू असतांना ‘प्रश्न वाटाघाटींनी सोडवा; पण मागे १०० बंदुका सिद्ध ठेवा,’ हा बिस्मार्कचा संदेश लक्षात ठेवणे आवश्यक !
भारत-पाक चर्चा विविध स्तरांवर झाली आणि चालू आहे; पण चर्चेचा अर्थ आपण पाऊल मागे घ्यावे, असे नव्हे. यासंदर्भात शरीफ यांचे वक्तव्य सूचक आहे. ते म्हणतात, ‘‘मी सर्व प्रश्नांवर वाटाघाटी करीन; पण काश्मीर बाजूला ठेवून चर्चा करणे हिताचे नव्हे.’’ ‘भारतानेसुद्धा काश्मीर भारताचाच आहे’, या पूर्वअटीवरच चर्चा चालू ठेवली पाहिजे. ‘प्रश्न वाटाघाटींनी सोडवा; पण मागे १०० बंदुका सिद्ध ठेवा,’ हा बिस्मार्कचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे.’
– राहुल गोखले
(संदर्भ : धर्मभास्कर, जुलै १९९७, पृष्ठ ४१-४२)