ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून युवकांसमोर आदर्श ठेवला ! – योगेश सोमण, अभिनेते
सांगलीत अभाविपचे ‘प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन’ उत्साहात !
सांगली, ६ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून लेखनाला स्वीकारले. त्यांनी कारागृहाच्या भिंतीवर त्यांचे लेखन केले. त्यातून समाज आणि राष्ट्रा विषयी त्यांची तळमळ दिसून येते. ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या १६ वर्षी ज्ञानेश्वरी लिहून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे, असे मार्गदर्शन अभिनेते योगेश सोमणे यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच यांच्या वतीने विभागस्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन पटवर्धन हायस्कूलमध्ये ५ जानेवारी या दिवशी पार पडले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यात सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा ५ जिल्ह्यांमधून ७ कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात मराठी कविता, हिंदी कविता, ललित लेख, वैचारिक लेख, कथा, पथनाट्य, अनुदिनी या कलाकारांचा समावेश आहे. यातून विजेत्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अंतिम ‘प्रतिभा संगम’साठी निवड होईल. प्रमुख अतिथी ‘चितळे फूड्स’च्या सौ. अनघा चितळे म्हणाल्या, ‘‘अभाविप सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. त्यातून संवेदनशील नागरिक सिद्ध होण्यास साहाय्य होते.’’
या वेळी शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य श्री. विशाल गायकवाड, सांगली शिक्षण संस्थेचे संचालक आणि शालेय समितीचे अध्यक्ष श्री. विजय भिडे, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हेमंत पाटणकर, प्रतिभा संगमचे निमंत्रक श्री. विशाल जोशी, सांगली महानगरमंत्री ऋषिकेश पाटील यांसह अन्य उपस्थित होते.