अन्नसुरक्षा अनुज्ञप्तीशिवाय (परवान्याशिवाय) खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय केल्यास दंड आणि कारावास होऊ शकतो ! – जगदीश मांजरेकर, सावंतवाडी व्यापारी संघ
सावंतवाडी – अन्नसुरक्षा अनुज्ञप्ती (परवाना) नसल्यास यापुढे कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही. परवाना न घेतल्यास १० सहस्र ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आणि कारावास होऊ शकतो. त्यामुळे शनिवार, ८ जानेवारी या दिवशी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात व्यापार्यांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण करावे किंवा परवान्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सावंतवाडी व्यापारी संघाच्या वतीने जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.
याविषयीच्या प्रसिद्धीपत्रकात मांजरेकर यांनी म्हटले आहे की,
खाद्यपदार्थ विक्रीसाठी अन्नसुरक्षा परवाना घ्यावा लागतो, तसेच नोंदणी करावी लागते. ती नसल्यास माल खरेदी करणे आणि विक्री करणे करता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बेकरी, मिठाई, किराणा, पानस्टॉल, अन्य स्टॉलधारक, घरगुती खानावळ; मास, मटन, चिकन विक्रेते, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि जे खाद्यपदार्थ विक्री करतात त्या सर्वांनाच अन्नसुरक्षा परवाना घेणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक अन् व्यावसायिक संघ यांच्या वतीने शनिवारी, ८ जानेवारीला सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ या वेळेत सावंतवाडी नगरपालिका व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला वेळेत उपस्थित राहून परवान्याचे नूतनीकरण अथवा परवान्यासाठी नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी अरविंद नेवाळकर (९८९०२९१६०७), जगदीश स. मांजरेकर (९४२२३७९६०४), नितीन वाळके (९४२२०५४५८८) यांच्याशी संपर्क साधावा.