९ जानेवारीला ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन
पणजी, ४ जानेवारी – भारतीय इतिहासात वीर सावरकर आणि त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग विसरता येणार नाही. अंदमानच्या काळकोठडीतील छळ-यातना सहन करून मातृभूमीसाठी कार्य करणार्या वीर सावरकरांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली. आजही खोट्या माहितीच्या आधारे अपप्रचार करून त्यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो रोखण्यासाठी त्याला ऐतिहासिक पुराव्यांसह उत्तर देणे आवश्यक होते, तसेच राजकीय मतभेद दूर सारून सावरकरांना लाभलेल्या दूरदृष्टीचा लाभ करून घेतला असता, तर भारताची फाळणीही टाळता आली असती. या दृष्टीने संशोधन करून केंद्रीय माहिती आयुक्त आणि प्रख्यात लेखक श्री. उदय माहुरकर आणि सहलेखक चिरायू पंडित यांनी ऐतिहासिक पुराव्यांसह सावरकरांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकणारे ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ हे पुस्तक लिहिले आहे.
या पुस्तकाचा गोव्यातील प्रकाशन सोहळा रविवार, ९ जानेवारी २०२२ या दिवशी असेल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला म्हापसा, गोवा येथील ‘स्वराज्य गोमंतक संघटने’चे अध्यक्ष श्री. प्रशांत वाळके आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांचीही उपस्थिती होती.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘या प्रकाशन सोहळ्याला लेखक आणि केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर; वंदनीय उपस्थिती तपोभूमी, कुंडई येथील प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी; मुख्य अतिथी म्हणून मुंबई येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्री. प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र), तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित रहाणार आहेत.
गोमंतकातील सावरकरप्रेमी आणि राष्ट्रभक्त नागरिक यांनी या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे. कार्यक्रमस्थळी कोरोनाच्या संदर्भात काळजी घेण्याच्या दृष्टीने सरकारने घोषित केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.’’ पत्रकार परिषदेत ‘स्वराज्य संघटने’चे अध्यक्ष श्री. प्रशांत वाळके म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वीर सावरकर यांचे संपूर्ण कुटुंबच होरपळून निघाले. स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण कुटुंबानेच यातना भोगणे अशी देशात हाताच्या बोटावर मोजण्याएवढी उदाहरणे आहेत. वीर सावरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा हा त्याग अत्युच्य प्रतीचा आणि हिंदुत्वाला चैतन्य देणारा आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन गोव्यात होणे, ही गोमंतकियांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे.’’
♦ कार्यक्रमाचे स्थळ ♦ गोवा विद्यापीठ, ‘केमिकल सायन्स’चे सभागृह, ताळगाव, गोवा. दिनांक : रविवार, ९ जानेवारी २०२२ वेळ : दुपारी ४.३० वाजता |