जळगाव महापालिकेतील नगररचना विभागात नागरिकांची पिळवणूक होते !
शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांचा आरोप
जळगाव – येथील महापालिकेतील शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी ‘महापालिकेचा कारभार भ्रष्ट आहे, नगररचना विभागात पुष्कळ प्रमाणात अपकारभार होत आहे, या विभागात कामांसाठी येणार्या नागरिकांची पिळवणूक केली जात आहे’, असा आरोप केला आहे. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सामाजिक माध्यमांत विज्ञापन प्रसिद्ध करून या भ्रष्टाचाराचे बिंग फोडले आहे. ‘ज्यांना नगररचना विभागात काम असेल, त्यांनी मला भेटावे. कोणतीही रक्कम न देता आपण त्यांचे काम करून देऊ’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रशांत नाईक म्हणाले की, महापालिकेत सत्ताधारी शिवसेना पक्षाचा मी नगरसेवक आहे. याची मला जाण आहे; परंतु नगररचना विभागात १ दलाल बसलेला आहे. जळगावकर जनतेसाठी मी बंड पुकारले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावर महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधात असलेली भाजप विकासासाठी एकत्र आहेत; मात्र असे असतांना विकास कामांमध्ये विघ्नसंतोष निर्माण केला जात आहे. जे सुरळीत चालू आहे, त्यात मिठाचा खडा टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. त्यांनी असे चुकीच्या पद्धतीने काम करू नये, अशी चेतावणी त्यांनी दिली.