राज्यातील सर्व विद्यापिठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
मुंबई – कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वृद्धी होत असल्याने राज्यातील सर्व विद्यापिठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विद्यापिठे आणि महाविद्यालये यांच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कुलगुरु यांच्यासमवेत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन परीक्षांमध्ये अडचणी येत असतील, तर विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पलाईन’ (साहाय्यासाठी) क्रमांक द्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. महाविद्यालयांसह वसतीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र जे विद्यार्थी परदेशातून आणि इतर राज्यांतून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी वसतीगृहाची सोय चालू राहील.