पू. (कु.) दीपाली मतकर या सनातनच्या संत घोषित झालेल्या दिवशी रामनाथी आश्रमातील साधकाने अनुभवलेले दैवी वातावरण !
पू. (कु.) दीपाली मतकर या सनातनच्या ११२ व्या समष्टी संत घोषित झालेल्या दिवशी रामनाथी आश्रमातील श्री. अमित डगवार यांनी अनुभवलेले दैवी वातावरण !
१. सकाळी उठल्यावर वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवणे आणि ‘साधनेच्या दृष्टीने काय प्रयत्न करायला पाहिजेत’, हे विचार आपोआप सुचणे
‘२८.१०.२०२१ या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो होतो. त्या वेळी वातावरणामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवत होते. एरव्ही उठल्यावर माझ्या शरिराला जडपणा जाणवतो; परंतु आज असे काही जाणवले नाही. मनामध्ये ‘परम पूज्य गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण आपल्यासाठी किती करत आहे ?’, हा कृतज्ञताभाव आपोआप निर्माण होत होता. ‘साधनेच्या दृष्टीने काय प्रयत्न करायला पाहिजेत’, हे विचारही आपोआप सुचत होते. वैयक्तिक कामे करतांनाही ‘देव आपल्या समवेत आहे’, असे मी अनुभवत होतो.
२. घराजवळील अंगणात गाय येणे, त्या वेळी वातावरण दिवाळीप्रमाणे वाटणे आणि नामजपही भावपूर्ण होणे अन् सनातनच्या मांदियाळीमध्ये कु. दीपाली मतकर या समष्टी संत मिळाल्याने त्या चैतन्याचा परिणाम झाला असल्याचे अनुभवता येणे
आमच्या घराजवळ साधारण दोन मासांपासून गाय आली नव्हती; परंतु आज अंगणामध्ये गाय आली आणि तिने अंगणामध्ये शेण टाकले. त्या वेळी वातावरण दिवाळीसारखे वाटत होते. माझी घरातील नेहमीची कामे पुष्कळ भावपूर्ण झाली. नामजप शांत आणि भावपूर्ण झाला. मन सकारात्मक स्थितीत होते. रात्री एका साधकाच्या ‘व्हॉट्सॲप’च्या ‘स्टेटस’वर दीपालीताई संत झाल्याचे कळले. त्या वेळी ‘मला आज दिवसभर जाणवत असलेला उत्साह, सकारात्मकता आणि भावस्थिती याचे कारण सनातनच्या मांदियाळीमध्ये एक समष्टी संत मिळाले आणि त्या चैतन्याचा परिणाम मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे अनुभवू शकलो’, असे मला जाणवले. याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अमित विजय डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |