हुंडा : समाजाचे शोषण करणार्या कुप्रथेच्या समूळ उच्चाटनाची आवश्यकता !
हुंडा ही चुकीची प्रथा असून ती रोखण्यासाठी सरकारने कायदा केला आहे; पण त्याची प्रभावी कार्यवाही पोलिसांकडून होत नाही, तसेच कायदा असूनही विविध क्लृप्त्या वापरून अद्यापपर्यंत हुंडा मागितला जाणे, हे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस आणि प्रशासन यांचे अपयशच म्हणावे लागेल. हुंडा पद्धत पूर्णतः बंद होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे, तसेच या कुप्रथेच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक
१. हुंडा मागणार्या लोकांनी प्रामाणिक लोकांना भ्रष्ट होण्यास भाग पाडणे
‘आजच्या समाजात कन्येचा जन्म होणे, हा एक अभिशाप झाला आहे. लोक हुंड्याची मागणी एवढी अवास्तव प्रकारे करतात की, कुणीही प्रामाणिक व्यक्ती प्रामाणिकपणे कमावलेल्या धनाद्वारे ती मागणी पूर्ण करू शकत नाही. यावरून हे स्पष्ट आहे की, हुंडा मागणारे समाजातील प्रामाणिक लोकांना भ्रष्ट होण्यास भाग पाडत आहेत. हुंडा मागणार्या अशा समाजाला ‘आपला समाज’, असे म्हणणे कितपत योग्य ?
२. हुंडा देण्यासाठी वधूच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची भूमी विकावी लागणे !
आज जेव्हा कुणाच्या घरात कन्येचा विवाह ठरतो, तेव्हा सर्वांत प्रथम हुंड्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी तिचे माता-पिता जमीन विकतात. प्रश्न हा आहे की, पुढच्या काळात जमीनच राहिली नाही, तर काय विकणार ? यावर प्रश्न निर्माण होतो की, जी मुलगी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन विकण्यास कारणीभूत होते, त्या कुटुंबामध्ये आपुलकी राहू शकेल का ?
३. हुंडा प्रथेमुळे होणारी हानी
३ अ. हुंडा ही केवळ वधूच्या कुटुंबियांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत नष्ट करणारी प्रथा ! : वरपक्षाचे लोक वधूच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे साधन विकण्यासाठी कारण बनत असतील, तर ते आप्तस्वकीय म्हणण्यास पात्र आहेत का ? त्यांचे वधूपक्षाकडील लोकांशी कधीतरी चांगले संबंध राहू शकतील का ? जर या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत, तर हे स्पष्ट होते की, हुंडा ही प्रथा केवळ वधूच्या कुटुंबियांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत नष्ट करणारी आहे.
३ आ. सामाजिक वैमनस्यात वाढ करणारी कुप्रथा ! : सामाजिक वैमनस्यात वाढ करण्यास हुंडा ही प्रथा सर्वाधिक कारणीभूत आहे. ‘अधिक हुंडा मिळाला, तर अधिक सन्मान’, ही कल्पना जर एका व्यक्तीमध्ये असेल, तर त्यावर उपाय करणे सोपे होते; परंतु समाजाचा बहुतांश वर्ग या दृष्टीने विचार करत असेल, तर या दुष्ट प्रथेशी संघर्ष करणे पुष्कळ कठीण होते.
३ इ. परंपरेच्या नावाखाली हुंडा घेण्याचे कुकर्म होणे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ! : लोक आपल्या स्वार्थासाठी आज दुसर्याचे आणि आपल्या भविष्याचे बलीदान करत आहेत. अशा प्रकारे स्वतःच स्वतःसाठी कबर खोदण्यात मग्न आहेत. हे सर्व चुकीच्या परंपरा आणि रिती यांच्या नावाखाली होत आहे. आज वरपक्ष आणि त्याच्यासह येणारे वरातीतील लोक वधूपक्षासह असा व्यवहार करतात, जणू काही त्यांना शोषण करण्याचा अधिकारच मिळाला आहे.
४. खरी परंपरा काय आहे ?
४ अ. ‘दात्यापेक्षा दान ग्रहण करणारा कधी मोठा होऊ शकत नाही’, असे राजा दशरथाने राजा जनकाला सांगणे ! : खरे पहाता आपल्या समाजाची परंपरा याच्या अगदी विरुद्ध आहे. राजा दशरथ राजा जनकाला म्हणतात, ‘‘तुम्ही महान आहात, तुमची आणि माझी तुलना होऊ शकत नाही. तुम्ही कन्येचे दान केले आणि मी दान ग्रहण केले आहे. दात्यापेक्षा दान ग्रहण करणारा कधी मोठा होऊ शकत नाही.’’
५. समाजातील विदारक सत्य स्थिती !
५ अ. सध्या हुंड्याच्या नावाखाली धमकी देऊन आणि भय दाखवून वधूपक्षाचे शोषण केले जाणे ! : आम्ही सुद्धा आज कन्यादानच करतो; परंतु आम्ही दान घेत नाही, तर आम्ही धमकी आणि भय दाखवून कुणाचे तरी शोषण करत आहोत, ज्याला ‘दरोडा घालणे’, असे म्हटले जाऊ शकते. असे लोक दान ग्रहणकर्ते नाहीत. ही राजा दशरथ आणि जनक यांच्याद्वारे स्थापित परंपरा आहे का ? आणि जर नसेल, तर ही क्षत्रिय परंपरा नाही.
६. हुंडा मागण्याच्या परंपरेचा त्याग करणे आवश्यक !
जर आम्हाला क्षत्रियांच्या रूपात जिवंत रहायचे असेल, तर या परंपरेचा त्याग करावाच लागेल; म्हणून जर आपण इच्छा करत असू की, भाऊ-बहीण यांच्यामध्ये प्रेमभाव आणि स्नेह रहावा, जर आपली इच्छा असेल की, आपल्या मुलांनी सुखी आणि कौटुंबिक जीवन व्यतीत करावे, जर आम्ही इच्छा करत असू की, पुत्रवधूने नातेवाइकांचा आदर करावा, त्यांची सेवा करावी, तर आपल्याला या विनाशकारी वाईट कर्मापासून मुक्त व्हावेच लागेल. हुंडा मागण्याच्या परंपरेचा त्याग करावा लागेल, तेव्हा समाजात खर्या अर्थाने सामाजिक विकास होईल. व्यक्ती आणि समाज तेव्हा शोषक म्हणवला जाणार नाही. लोकांमध्ये समाजाप्रती प्रेम, स्नेह उत्पन्न होईल आणि सामाजिक उपक्रमांमध्ये लोकांना आवड निर्माण होईल.’
– नीलम सिंह, कोकण विभागीय महिला अध्यक्षा, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, खारघर, जिल्हा पालघर.