आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांची हकालपट्टी करा ! – परिणय फुके, आमदार, भाजप
भंडारा जिल्ह्यातील धान घोटाळा प्रकरण
नागपूर – भंडारा जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या धान घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकार्याची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात कारवाईसाठी टाळाटाळ करणारे आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी ४ जानेवारी या दिवशी येथे पत्रकार परिषदेत केली. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कारवाईच्या समितीने १० मास लोटूनही संबंधित दोषींवर कारवाई न केल्याविषयी फुके यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
आमदार परिणय फुके पुढे म्हणाले की, धान खरेदी प्रकरणात वर्ष २०१९-२० मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. यामध्ये राज्य सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांना विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात फौजदारी आणि प्रशासकीय कारवाई करावी, यासाठी भंडारा येथील पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली अपर जिल्हाधिकारी अन् कृषी अधिकारी यांची १ समिती गठित करण्यात आली; मात्र १० मास लोटूनही या प्रकरणामध्ये कोणतीच कारवाई झाली नाही.
आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक सोपान सांभारे यांच्या कार्यकाळातील हा धान खरेदी घोटाळा आहे. प्रारंभी शासनाने त्यांचे भंडारा येथून स्थानांतर केले होते; परंतु के.सी. पाडवी यांनी व्यवस्थापक सांभारे यांचे पुन्हा भंडारा येथे स्थानांतर केले. त्यामुळे आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या सर्व प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांच्याशी भेट घेण्याच्या प्रयत्न केला; पण त्यांनी भेट देण्यास नकार दिला. त्यामुळे मंत्री पाडवी या घोटाळ्याला पाठीशी घालत आहेत, असा आरोप फुके यांनी केला आहे.