मुंबई पोलिसांकडून एका मुलीसह ३ जणांना अटक ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त
‘बुली बाई’ ॲप प्रकरण
मुंबई – मुसलमान समाजातील महिलांची ‘बुली बाई’ या ॲपवरून अपर्कीती केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. त्यात श्वेता सिंह (वय १८ वर्षे) या मुलीचा समावेश असून पोलिसांनी तिला उत्तराखंडातील उधमसिंहनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. या प्रकरणात ही मुलगी मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सायबर पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत, अशी माहिती मुंबई येथील पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ५ जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, या वादग्रस्त ॲपच्या माध्यमातून मुसलमान महिलांच्या भावना दुखावतील असे कृत्य केले गेल्याने या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या संवेदनशील घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठीही सतर्कता बाळगणे आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणी काही इमेल पोलिसांच्या हाती लागले आहेत, त्याचे आता कसून अन्वेषण केले जात आहे. ज्या नागरिकांना या वादग्रस्त ॲपविषयी अधिक माहिती द्यायची असेल, त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या ॲप प्रकरणात नेपाळ, देहली, महाराष्ट्र आणि बेंगळुरू या राज्यांसह अनेक प्रदेशांतील सुशिक्षित तरुण सहभागी आहेत. मुंबई पोलिसांनी याच प्रकरणात मयंक नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी अभियंत्याचे शिक्षण घेणारा विशाल झा याला बंगळुरू येथून ४ जानेवारी या दिवशी अटक केली होती.