निष्काम कर्मयोगी : सिंधुताई सपकाळ !

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ

४ जानेवारी या दिवशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख असलेल्या सिंधुताईंची वयाच्या ७५ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. नि:स्वार्थीपणा, इतरांवर प्रेम करणे, करुणा, धडाडी आदी विविध गुणांचा समुच्चय असणार्‍या सिंधुताई या ‘आदर्श समाजसेवक कसा असावा ?’ याचे मूर्तीमंत उदाहरण होत्या. स्वत:च्या जीवनात घोर संकटांचा सामना केला असतांना खचून न जाता त्यांनी अनाथ मुलांचे दायित्व स्वीकारून ते सक्षमपणे निभावले. निराधारांना साहाय्य करण्यासाठी त्यांनी प्रसंगी स्वत: पदरमोडही केली. उत्तुंग कार्याचा पायाही भक्कम असतो, त्याप्रमाणे सिंधुताईंच्या निर्माेही कार्याला त्यांच्यातील सुसंस्कारांचा भक्कम पाया आहे. त्यांनी भारतीय (हिंदु) संस्कृतीतील तत्त्वांना केंद्रीभूत मानून स्वत:चे जीवन व्यतीत केले. इतरांनाही तीच शिकवण दिली. सध्याच्या काळात हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणणारे समाजसेवक अभावानेच आढळतात. तथाकथित आधुनिकतावादाची टिमकी वाजवणारे आणि स्वत:ला समाजसेवक म्हणवणारे मात्र ढीगभर आढळतात. अशांकडून ‘समाजकार्य किती प्रमाणात होते ?’, हा प्रश्नच आहे. अशा जगात मनापासून समाजसेवा करणार्‍या सिंधुताई सपकाळ या निश्चितच सर्वांना आदरणीय आहेत.

महिला सक्षमीकरण आणि सिंधुताई !

उथळ पाण्याला खळखळाट असतो, तर खोल डोहातील पाणी शांत असते. त्याप्रमाणे व्यापक आणि समाजहितैषि कार्य करणार्‍यांचे व्यक्तीमत्त्वही प्रगल्भ असते. ही प्रगल्भता येण्यासाठी धर्माचरण (जे आजच्या तथाकथित स्त्री मुक्तीवाद्यांना बंधन वाटते) आवश्यक आहे, हेच सिंधुताई यांच्या उदाहरणातून नेमके अधोरेखित होते. ‘स्त्री ही माऊली असते. तिने तिच्या मर्यादांच्या चौकटीतच रहायला हवे. शिकणे म्हणजे उच्छृंखल होणे नव्हे’, हे सिंधुताईंचे विचार आजच्या महिलावर्गाने लक्षात घ्यायला हवेत, तसेच त्याप्रमाणे आचरण करायला हवे. स्त्री-पुरुष समानतेविषयी सिंधुताई म्हणतात, ‘स्त्री ही स्त्री असते, तिच्यामुळे कुटुंब चालते आणि पुढे देश चालतो. असे असतांना स्त्रीची पुरुषाशी बरोबरी कशी होईल ?’ थोडक्यात ‘हक्कांसाठी भांडणे म्हणजे समान अधिकार मिळवणे नव्हे’, हेच त्यांनी या माध्यमातून सांगितले. एकदा सिंधुताई यांना शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन चालू असण्याविषयी त्यांचे मत विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘‘मी भारतीय संस्कृतीच्या तत्त्वांना मानणारी आहे.’’ ‘स्त्रियांनी अबला नाही, तर खंबीर असावे’, असा सिंधुताईंचा आग्रह असे. भारतीय प्राचीन (हिंदु) संस्कृतीत महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक निर्णयांत स्त्रियांना सहभागी करून घेतले जात असे. त्या वेळी स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धाडस नव्हते. महिलांचा उचित सन्मान होत होताच, त्यासमवेत स्त्रीला मर्यादांचेही भान होते, ती क्षात्रतेजसंपन्नही होती. याच हिंदु संस्कृतीचा पगडा सिंधुताई यांच्यावर आहे. म्हणूनच त्या कणखर आणि निर्भीड आहेत. वेळप्रसंगी त्यांच्यातील तत्त्वनिष्ठताही (योग्य संताप) समाजाने पाहिली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या संदर्भात सिंधुताई पोटतिडकीने महिलांनी स्वत:तील आत्मबल वाढण्याविषयी बोलत असत. ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर (यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग) वाहनांचे नियम पाळले जात नसल्याने, तसेच वाहतूक पोलीसही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपेक्षित प्रयत्न करत नसल्याने अनेक अपघात होत असल्याविषयी सिंधुताई यांनी कठोर शब्दांत उत्तरदायींना जाणीव करून दिली होती. याविषयीचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला होता.

सिंधुताई सपकाळ यांचे रहाणीमान साधे असे. त्या नऊवारी साडी परिधान करत. अमेरिकेत गेल्यानंतरही त्या याच पेहरावात होत्या. भारतीय संस्कृतीचे आचरण करण्यात त्यांनी कधी भीड बाळगली नाही. ग्रामीण मराठी भाषा, साधा पोशाख असे असूनही विचारांनी समृद्ध असलेल्या सिंधुताई यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली येणार्‍या आणि हिंदु संस्कृतीला न्यून लेखणार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे.

सिंधुताई यांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी आणि कार्याविषयी उलगडण्यास शब्दांची मर्यादा आहे; परंतु ‘हिंदु संस्कृतीतील सुसंस्कारांचा भक्कम पाया आणि त्याआधारे केलेली नि:स्वार्थ सेवा, वैचारिक प्रगल्भतेने समाजाला केलेले दिशादर्शन ’, हे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अन् कार्याचे सार आहे. खरे पहाता निवळ चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण झाले असले, तरी सिंधुताईंचे विचारच खर्‍या अर्थाने महिला सक्षमीकरणाला पूरक आहेत. यावरून मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट होतात आणि भारतीय म्हणजेच हिंदु संस्कृतीची महानता पुन्हा अधोरेखित होते.

निःस्वार्थ समाजसेवा !

स्वत:च्या जीवनप्रवासाविषयी एकदा सिंधुताई म्हणाल्या होत्या, ‘फुलांवरून जातांना काटेही आडवे येणारच, ही सिद्धता पावलांनी ठेवायची असते.’ समाजकार्य करतांना त्यांना काही प्रतिकूल अनुभवही आले. सरकारने सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवले, हे स्वागतार्ह असले, तरी दुसरीकडे समाजसेवेच्या नावाखाली गोरगरीब हिंदूंचे आमिषे दाखवून धर्मांतर करणार्‍या ‘मदर तेरेसा’ यांना भारताचा सर्वाेच्च ‘भारतरत्न’ दिला जातो आणि सिंधुताई यांच्या कार्याला साजेसा त्यांचा गौरव होत नाही, हे हिंदूंना रुचणारे नाही. अर्थात् सिंधुताई यांचे कार्य कोणत्याही पुरस्कारात मोजण्यासारखे नाही. ते त्याहूनही मोठे आहे. सिंधुताई या निष्काम कर्मयोगी होत्या. समाजसेवा हे त्यांनी ‘व्रत’ म्हणून अंगीकारले. त्यामुळे त्या शेवटपर्यंत निरासक्त आणि निर्माेही राहिल्या. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे अनेक समाजसेवक आपल्याला समाजात पहायला मिळतात. अशांमध्ये समाजसेवेद्वारे निष्काम कर्मयोग साधणार्‍या सिंधुताई यांचे कार्य उठून दिसते. त्यांच्यासारख्या निष्काम कर्मयोग्यांची आज भारताला आवश्यकता आहे !