‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने विशाळगडाचे पावित्र्य राखले जाण्यासाठी पहारा मोहीम पार पडली !
विशाळगडावर परत एकदा सापडल्या मद्याच्या बाटल्या आणि अमली पदार्थ !
विशाळगडासह जवळपास प्रत्येक गडाची ३१ डिसेंबरच्या आसपास अशीच स्थिती असते. ही स्थिती प्रशासन आणि नागरिक या दोघांसाठीही लज्जास्पद आहे ! पुरातत्व विभागाकडून गडांचे दायित्व काढून ते दुर्गप्रेमींकडे देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक
कोल्हापूर, ५ जानेवारी (वार्ता.) – ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने विशाळगडाचे पावित्र्य राखले जाण्यासाठी ३० डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत पहारा मोहीम राबवण्यात आली. पहारा देतांना ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’च्या तरुणांना मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या आणि अमली पदार्थ सापडले. मिळालेल्या या सर्व वस्तू ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ने ४ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्या. त्याची पहाणी करून निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी या सर्व वस्तू शाहूवाडी येथील राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे या सर्व वस्तू राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देवणे यांच्याकडे जमा करण्यात आल्या.
या उपक्रमात ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’चे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, कागल तालुकाध्यक्ष सुरज शेटके, राधानगरी तालुकाध्यक्ष श्री. ओंकार गोते यांच्यासह सर्वश्री प्रदीप भामटेकर, वैभव खोत, अमर अदमापुरे, प्रथमेश आवळेकर, सतीश देवलकर, अतुल खोत, अनिकेत पाटील, ओंकार पाटील, आलताफ मुलाणी यांसह ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.
१. ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने विशाळगडावर पहारा देतांना गडावर अनेक ठिकाणी नागरिक मद्यपान करतांना, जुगार खेळतांना आणि अमली पदार्थाचे सेवन करतांना आढळले.
२. या लोकांना समज देऊन त्यांच्याकडून हे साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर हे साहित्य ४ जानेवारी या दिवशी जमा करण्यात आले.
३. जमा करण्यात आलेले साहित्य साधारणत: ३ लाख रुपयांचे असून ३५ सहस्र रुपयांचे गावठी मद्य नष्ट करण्यात आले.
४. २६ डिसेंबर या दिवशी विविध गडप्रेमी संघटना यांच्या वतीने १५० युवकांच्या साहाय्याने ‘विशाळगड स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले होते. त्या वेळी १ टन मद्याच्या बाटल्या आणि १ टन प्लास्टिक कचरा सापडला होता. यानंतर केवळ ४ दिवसांतच इतक्या मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या, अमली पदार्थ सापडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’च्या (रेस्क्यु टीम)वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांचा सत्कार !
ही मोहीम चालू करण्यापूर्वी ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम) यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे विशाळगडावर असा पहारा देण्यासाठी अनुमती मागितली. यानंतर शंकरराव जाधव यांनी या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभाग, शाहूवाडीचे तहसीलदार यांच्या समवेत सर्व यंत्रणांची बैठक घेत या मोहिमेचे पत्र या फोर्सला दिले. या गोष्टीसाठी ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम)च्या वतीने शंकरराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते. या वेळी शंकरराव जाधव म्हणाले, ‘‘ गडावर अशा प्रकारे अनुचित प्रकार घडू नये; म्हणून प्रत्येक मासाला आढावा बैठक घेतली जाईल, तसेच अचानक धाड टाकून पडताळणी केली जाईल.’’ |