भटिंडा (पंजाब) येथे आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याचा मार्ग अचानक अडवला !
|
पंतप्रधानांसारख्या अतीमहनीय व्यक्तीच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवणार्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक
भटिंडा (पंजाब) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेमध्ये मोठी चूक झाल्याची घटना घडली. येथील हुसैनीवाला भागातील उड्डाणपुलावरून पंतप्रधान मोदी यांच्या वाहनाचा ताफ जात असतांना समोरून कृषी कायद्याचा विरोध करणार्या शेतकरी आंदोलकांच्या वाहनाचा ताफ पोचला अणि त्यांनी रस्ताबंद केला. अचानक घडलेल्या या स्थितीमुळे पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेले सुरक्षारक्षक सतर्क झाले. जवळपास २० मिनिटे पंतप्रधान मोदी यांचा रस्ता अडवून धरण्यात आल्यानंतर मोदी यांचा ताफा मागे परतला. या घटनेवरून संपूर्ण देशातून पंजाबमधील काँग्रेस सरकार आणि पोलीस यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. ‘पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याला कोण उत्तरदायी आहे ?’, यावर आता चर्चा चालू झाली आहे. ‘पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा कोणत्या मार्गाने जाणार’, हे गोपनीय ठेवण्यात येत असतांना ‘शेतकरी आंदोलकांना त्याची माहिती कशी झाली ?’, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी या घटनेवरून, ‘पंतप्रधान नियोजित कार्यक्रमानुसार हेलिकॉप्टरमधून येणार होते. त्यांनी अचानक नियोजन पालटून वाहनाद्वारे येण्याचा ठरवले आणि याची कल्पना पोलिसांनी न दिल्यामुळे ही घटना घडली’, असा आरोप केला आहे.
#PMModi‘s first rally in poll-bound Punjab, scheduled to take place in #Ferozepur has been cancelled.https://t.co/XnzXP5y5PZ
— HT Punjab (@HTPunjab) January 5, 2022
केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेविषयी निवेदन प्रसिद्ध करतांना म्हटले, ‘आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोचले. तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते; परंतु पाऊस होता आणि हवामानही खराब होते. त्यामुळे सुरक्षायंत्रणांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली; मात्र हवामानात सुधारणा न झाल्याने मोदी यांनी वाहनाने नियोजित स्थळी जाऊन स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा प्रवास तब्बल २ घंट्यांचा होता. पंजाब पोलिसांकडून ‘आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे’, असे कळवले. यानंतर पंतप्रधान वाहनाने प्रवास करण्यास निघाले. हुसैनीवाला येथील स्मारकापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोचला. तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदी यांनी १५-२० मिनिटे अडकून रहावे लागले. पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार त्यांची सुरक्षा, तसेच आकस्मिक योजना सिद्ध ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था करायला हवी होती; मात्र तसेच घडले नाही. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदी यांचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. याविषयी राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. या घटनेतचे दायित्व निश्चित करून कठोर कारवाई करावी, असे राज्य सरकारला सांगण्यात आले आहे.
तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी किमान जिवंत तरी आहे ! – पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया
भटिंडा विमानतळावर पोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील राज्य सरकारच्या कर्मचार्यांना ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोचू शकलो’ असे सांगितले. ए.एन्.आय. वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे.