राज्यात रुग्णसंख्या वाढली, तर कठोर उपाययोजना ! – उपमुख्यमंत्री
सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यशासनाने विविध स्तरांवर उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. राज्यातील १० मंत्री आणि २० आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील काही भागांत कडक दळणवळण बंदी लागू शकते. रुग्णसंख्या अशीच झपाट्याने वाढत राहिल्यास राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. याविषयी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्यावर सर्व राज्यात कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. नंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दळणवळण बंदी घोषित केली आहे. अनेक राज्यांत सध्या रात्रीची संचारबंदी लागू आहे. देहली, बेंगळुरू येथेही याविषयी कडक कार्यवाही चालू आहे; कारण जेवणासाठी अन् चहा-पाण्यासाठी आपण मुखपट्टी (मास्क) काढतो. तेव्हा आपण एकमेकांच्या समोर येतो. यांमुळे कोरोना झपाट्याने वाढत आहे. आपण सर्वांनी या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.