कोरोनाचा नवा ‘व्हेरीयंट ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हा प्रशासनास निवेदन
कोल्हापूर, ४ जानेवारी (वार्ता.) – गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ‘ओमिक्रॉन’ नावाच्या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरीयंट’मुळे (प्रकारामुळे) कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असणार्या आरोग्य सुविधा, उपलब्ध रुग्णालये, प्राणवायूची आवश्यकता, आधुनिक वैद्य-परिचारिका या सर्वांचाच आढावा घेणे अत्यावश्यक आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेत राहिलेल्या त्रुटी दूर करून प्रशासनाने गतीने हालचाली कराव्यात, या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकार्यांना ४ जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले.
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्वीकारले. या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, श्री. सुशील भांदिगरे, श्री. सुनील पाटील, श्री. महादेव पाटील, हिंदु एकताचे श्री. चंद्रकांत बराले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
१. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांचे आधारस्तंभ आहे; मात्र गंभीर गोष्ट म्हणजे येथे संमत असलेली २८ पदे रिक्त आहेत. आधुनिक वैद्यांची पदे रिक्त असल्याने येथील कामाचा भार अन्य आधुनिक वैद्यांवर पडत आहे.
२. अनेक विभागांची विभाग प्रमुखपदे रिक्त असून रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाचे वैद्यकीय अधीक्षपदही रिक्तच आहे. त्वचारोगतज्ञ, शल्यचिकीत्सा, अस्थिव्यंगोपचार प्राध्यापकांची, तर शल्यचिकीत्सा शास्त्र, त्वचा, बधिरीकरण शास्त्र, क्ष-किरणशास्त्र अशा सहयोगी प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.
३. यापुढील काळात रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार नाही. अनेक सार्वजनिक ठिकाणांसह अनेक ठिकाणी मास्क न घालणे, सामाजिक अंतर पाळणे यांसह अनेक नियमांचे उल्लंघन नागरिकांकडून होतांना दिसत आहे. तरी या संदर्भात कठोर कारवाई करावी. अद्यापही अनेक नागरिकांचा कोरोना प्रतिबंधकात्मक लसीचा दुसरा डोस झालेला नाही.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या..
१. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील संमत असलेली २८ रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.
२. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, अशा गोष्टींवर सक्ती करण्यात येऊन नियम न पाळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
३. नागरिकांना कोरोना प्रतिबंधकात्मक लसीचा दुसरा ‘डोस’ घेण्यासाठी प्रवृत्त करावे.
४. परराज्यातून विशेषत: गोवा आणि कर्नाटक राज्यातून येणार्यांना ‘आर.टी.पी.सी.आर्.’ चाचणी सक्तीची करावी.
५. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर त्यावरील सर्व उपचार नागरिकांना विनामूल्य मिळावेत आणि त्याचे दायित्व शासनाने घ्यावे.