‘साधकांचे त्रास न्यून व्हावेत’, अशी तळमळ असलेले आणि स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणारे सर्वज्ञ परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘वर्ष २००४ आणि २००५ मध्ये मला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या समवेत वाहनचालक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी आम्ही ‘टाटा इस्टेट’ या पिवळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून प्रवास करत असू. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच त्यांच्यातील जाणवलेले दैवी गुण पुढे दिले आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून सूक्ष्मातील गोष्टींचा अभ्यास कसा करवून घेतला ? तसेच स्वतःच्या कृतीतून त्यांनी साधकांना कसे शिकवले ? हे ४ जानेवारी या दिवशी आपण पाहिले. आज लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/540831.html
६. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या आश्रमात पोचायला उशीर झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे पाय धरून त्यांची क्षमा मागणे
एकदा एका दौर्याच्या कालावधीत आम्ही श्रीरामपूर येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या आश्रमात जाण्यास निघालो. वाटेत रस्ता चुकल्यामुळे त्यांच्या आश्रमात पोचण्यास आम्हाला ४५ मिनिटे उशीर झाला; मात्र आश्रमात पोचल्यानंतर लगेचच परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे पाय धरून त्यांची क्षमा मागितली. यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा माझ्या लक्षात आला.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता दर्शवणारे काही प्रसंग
७ अ. साधकाने काहीही न सांगता त्याला होणारे त्रास जाणणे आणि साधिकेला त्यावर उपाय सांगण्यास सांगणे : एकदा गुरुदेवांच्या समवेत गोवा येथून मिरज येथे येत असतांना मला अकस्मात् विविध प्रकारचे त्रास होत होते. यात प्रवासाच्या कालावधीत मला बाहेर गाडीवर दिसणारे खाद्यपदार्थ, तसेच मांस, मासे असे पदार्थही खाण्याची अनिवार इच्छा होत होती. हे मी परात्पर गुरुदेवांना सांगितले नाही. मिरज येथे पोचल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी वैद्या (कु.) माया पाटील यांना ‘मला काय होत आहे ?’, हे विचारून घेऊन योग्य ते उपायही सांगण्यास सांगितले. मी त्यांना काहीही सांगितलेले नसतांना माझ्या अंतर्मनातील विचार ओळखून त्यांनी उपाय सांगण्यास सांगितल्यावर मला त्यांच्या सर्वज्ञतेची जाणीव झाली.
७ आ. साधकाची देवीच्या दर्शनाची इच्छा जाणून ती पूर्ण करणे
१. सनातन संस्थेत येण्याच्या पूर्वीपासून मला छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी असलेली श्री तुळजाभवानी, तसेच संस्थेत आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांची कुलदेवी श्री योगेश्वरी हिचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती; मात्र याविषयी मी कधी परात्पर गुरु डॉक्टरांना बोललो नव्हतो. असेच एकदा दौर्यावर असतांना आम्ही तुळजापूर येथे गेलो. त्या वेळी गाडी वाहनतळावर लावायची असल्याने मी सोडून अन्य सर्व साधक देवीच्या दर्शनासाठी गेले. त्या वेळी मी गाडीतच थांबलो होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह सर्व साधक दर्शन घेऊन परत आले. त्या वेळी आल्या आल्या परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘अरे, तू आला नाहीस ? तुझ्यासाठीच तर आपण इकडे आलो.’’ नंतर वेळ अल्प असल्याने मी केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
२. अशाच प्रकारे आम्ही पुढे अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरीदेवीच्या दर्शनासाठी गेलो. त्या वेळी गाडीतून सर्व साधक उतरले आणि मी गाडी वाहनतळात लावण्यासाठी गेलो. यानंतर लगेचच परात्पर गुरु मला म्हणाले, ‘‘सगळ्यांच्या आधी तू दर्शन घेण्यासाठी पुढे जा. आपण येथे तुझ्यासाठीच तर आलो आहोत.’’ या प्रसंगामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
८. अनुभूती
८ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत प्रवास करतांना दैवी सुगंध जाणवणे, त्यामुळे प्रवासात थकवा न येता उत्साह वाटणे आणि गाडीतील सर्वच वस्तूंना दैवी सुगंध येणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत प्रवास करतांना अनेक घंटे प्रवास करूनही कधीच कंटाळा किंवा थकवा जाणवायचा नाही. त्यांच्या समवेत सतत एक सुगंध जाणवायचा. यामुळे त्यांच्या समवेत असणारे आम्ही सर्व साधक नेहमीच उत्साही असायचो. काही कालावधी गेल्यानंतर गाडीतील सर्वच वस्तूंचा सुगंध येत असे. गाडीत असलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र, ते पुसण्यासाठी वापरत असलेले कापड, परात्पर गुरु डॉक्टर वापरत असलेली पेन्सिल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.
अशा प्रकारे विविध प्रसंगांमधून शिकवल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.’ (समाप्त)
– श्री. महेश पेडणेकर, कोल्हापूर सेवाकेंद्र (२७.३.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |