महापालिका क्षेत्रातील सांडपाण्यामुळे मिरज हद्दीतील ४०० एकर भूमी खराब; पाणी सोडणार्यांवर कारवाई करा ! – जयगोंड कोरे, भाजप
मिरज, ३ जानेवारी – महापालिका क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी प्रभाग २० मधून निलजी रस्त्यावरील नाल्यात सोडले आहे. या रसायनयुक्त पाण्यामुळे मिरज महापालिका हद्दीतील ४०० एकर भूमी खराब झाली आहे. त्याचसमवेत शेतकर्यांना या रसायनयुक्त पाण्याने त्वचारोग आणि जखमा होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि परिसरात रहाणारे नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेने नाल्यात रसायनयुक्त पाणी, तसेच भुयारी गटारीचे पाणी सोडणार्यांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे प्रदेश सचिव जयगोंड कोरे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले. (हिंदूंच्या गणेशोत्सव, दीपावली अशा प्रत्येक उत्सवांत प्रदूषणाचे कारण सांगून आरोळी ठोकणारे पर्यावरणप्रेमी, तसेच गणेश विसर्जनावर टीका करणारे अशा प्रसंगी कोणत्या बिळात जाऊन लपतात ? याचसमवेत महापलिकेनेही यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
अतिरिक्त आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संदर्भात प्रदूषण मंडळानेही कारवाई करणे अपेक्षित आहे. शेतामध्ये काही पिकत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. लवकरात लवकर या पाण्याच्या संदर्भात नियोजन न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या वेळी मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे, विजय कोरे, प्रदीप कोरे, आदिनाथ शेडवळे यांसह शेतकरी उपस्थित होते.
निवेदन दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांगी, उपायुक्त चंद्रकांत आडके यांसह अन्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली. त्या वेळी तेथे उपस्थित असणार्या शेतकर्यांनी गेल्या अनेक मासांपासून असे पाणी येत असून शेतीची मोठी हानी होत असल्याची माहिती दिली. या वेळी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.