कराड ही शूरवीरांची भूमी ! – लेफ्टनंट राघवेंद्रसिंह शेखावत
कराड, ३ जानेवारी (वार्ता.) – कराड शहराला मोठी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी आहे. या भूमीने अनेक शूरवीरांना जन्म दिला आहे. त्यामुळे ही भूमी खर्या अर्थाने शूरवीरांची भूमी आहे. मी मराठा बटालियनमध्ये कार्यरत असून या पवित्र भूमीत आल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शूरवीरांच्या या भूमीला मी नम्रतापूर्वक प्रणाम करतो, असे प्रतिपादन ‘७ मराठा लाईफ इंफंट्री बटालियन’चे लेफ्टनंट राघवेंद्रसिंह शेखावत यांनी केले.
लेफ्टनंट शेखावत सध्या महाराष्ट्र दर्शन दौर्यावर आहेत. कराड येथील प्रीतीसंगम घाटावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.
लेफ्टनंट शेखावत यांनी विजय दिवस चौकातील विजय स्मृति स्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी ‘विजय दिवस समारोह समिती’चे सहसचिव विलास जाधव यांनी कराडचे ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व सांगितले, तसेच कराड परिसरातील किल्ले वसंतगड, हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, महाराणी ताराबाई, किल्ले सदाशिवगड, आगाशिव येथील डोंगरातील लेणी, कृष्णा-कोयना नद्यांचा प्रीतीसंगम यांविषयी माहिती दिली. तसेच कराड येथे गत २३ वर्षांपासून चालू असलेल्या ‘विजय दिवस समारोहा’चीही माहिती देण्यात आली. ही माहिती ऐकून लेफ्टनंट शेखावत प्रभावित झाले. त्यांनी कराड भूमीचे आणि येथील शूरवीर यांचे पुष्कळ कौतुक केले.