भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा !
भोपाळमध्ये एका ४ वर्षांच्या मुलीवर ५ भटक्या कुत्र्यांनी आक्रमण करून तिला गंभीररित्या घायाळ केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आणि ती राष्ट्रीय बातमी झाली. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ‘या कुत्र्यांचे आता करायचे काय ?’, असा प्रश्न देशभरातील जनतेच्या मनात गेली अनेक वर्षे पडलेलाच आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक नगरपालिका भटक्या कुत्र्यांना पकडून विद्युत् झटका (शॉक) देऊन अथवा विषारी पदार्थ खाण्यास देऊन ठार करत होती; मात्र प्राणीमित्र संघटना, नागरिक, तसेच प्राणीमित्र मेनका गांधी यांनी याला विरोध करत हे प्रकरण देहली उच्च न्यायालयात नेले आणि कुत्र्यांना ठार मारण्यावर बंदी घालण्यात आली. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही असाच निर्णय दिल्यानंतर कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येऊ लागले; मात्र याची कूर्मगती आणि दुसरीकडे कुत्र्यांची वाढती संख्या पहाता याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नाही. या निर्णयाला काही संघटनांनी न्यायालयात जाऊन विरोध केला, तरी त्यात काहीच पालट झाला नाही. आज देशातील गल्ल्या आणि लहान रस्ते यांवरून रात्रीच्या वेळी दुचाकी, चारचाकी वाहनांतून जाणे धोक्याचे ठरत आहे; कारण भटक्या कुत्र्यांचा घोळका त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी गाडीच्या मागे वेगाने धावत असल्याचे प्रसंग अनेक जण प्रतिदिन अनुभवत आहेत. यामुळे अपघात झाल्याच्या घटनाही घडत आहेत.
सरकार आणि प्रशासन न्यायालयाच्या आदेशामुळे हात बांधलेल्या अवस्थेत भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पहात आहे. कुत्र्यांना ठार केले, तर ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि २५ सहस्र रुपये दंड भरावे लागेल, या भीतीने लोक कुत्र्यांना काही करण्यास धजावत नाहीत. तरीही कुत्र्यांना विष असलेले पदार्थ देऊन ठार करण्यात आल्याच्या काही घटना देशात घडलेल्या आहेत. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यासाठी स्वतंत्र अभयारण्यासारखी जागा ठेवण्याचा विचारही काही वर्षांपूर्वी पुढे आला होता. मुंबई महानगरपालिकेने असा प्रयत्न केला होता; पण पुढे त्याचे काय झाले ? हे जनतेला समजू शकलेले नाही. भटक्या कुत्र्यांना पकडून जंगलात सोडण्याचाही विचार पुढे आला होता. प्रत्येक मनुष्याला आणि प्राणीमात्राला जगण्याचा अधिकार देवाने दिला आहे; मात्र जर अशा मनुष्यामुळे किंवा प्राण्यामुळे मनुष्याच्या जिवाला धोका निर्माण होत असेल, तर त्यावर कठोर उपाययोजना करता येऊ शकते, असे हिंदु धर्मात सांगितलेले आहे; कारण कोणत्याही प्राण्यापेक्षा मनुष्य अधिक श्रेष्ठ आहे, तर प्राण्यांचे जीवन हे भोग भोगण्यासाठी आहे. त्यामुळेच मनुष्याच्या जीवनाच्या रक्षणासाठी नरभक्षकांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. यावर आता चर्चा झाली पाहिजे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता राष्ट्रीय समस्या होऊन यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत आणि संसदेतही यावर चर्चा घडवून ‘लोकांचा जीव महत्त्वाचा कि भटक्या कुत्र्यांचा ?’, याचा निर्णय आता घेतला पाहिजे. अशा भूमिकेतून याकडे पाहून जनहिताचा निर्णय घेतला पाहिजे !