शिष्यभावात राहून नृत्याराधना करत अंतर्साधना साधणार्या दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया परचुरे !
दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया परचुरे या माझ्या बालमैत्रीण आहेत. गेली ४१ वर्षे त्या नृत्यसाधना करत आहेत. मी लहानपणापासून त्यांची नृत्यकलेविषयीची ओढ आणि नृत्यकलेवरील निष्ठा पहात आले आहे. काही मासांपूर्वी आमची भेट झाली. तेव्हा त्यांच्याकडून नृत्य आणि एकंदर संगीतकला यांविषयी विविध सूत्रे शिकायला मिळाली. ही सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे दिली आहेत.
(३ जानेवारी २०२२ या दिवशी सौ. सोनिया परचुरे यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.)
१. हातातील रज-तमात्मक घड्याळ काढल्यावर विद्यार्थिनीच्या हस्तमुद्रा नीट होऊ लागणे
‘माझी (सौ. सोनिया परचुरे) एक विद्यार्थिनी नृत्य करत असतांना तिच्या हस्तमुद्रा विचित्र होत होत्या. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘तुझ्या हातातील घड्याळ काढ.’’ ते काढल्यावर विद्यार्थिनीच्या हस्तमुद्रा नीट होऊ लागल्या.’’
(हे ऐकल्यावर मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण पूर्वी जेव्हा आम्ही अनिष्ट शक्तींचे त्रास न्यून व्हावेत, यासाठी आम्ही नामजप करत असू. तेव्हा एक संत आम्हाला नेहमी सांगत, ‘‘नामजप करतांना घड्याळ घालू नका. घड्याळ हे रज-तमात्मक असते. त्यामुळे त्याचा आधार घेऊन अनिष्ट शक्ती नामजप करतांना तुम्हाला त्रास देऊ शकतात.’’ सौ. सोनिया यांना ही गोष्ट ठाऊक नव्हती, तरीही विद्यार्थिनीच्या विचित्रपणे होणार्या हस्तमुद्रा सुधारण्यासाठी त्यांनी तिला ‘घड्याळ काढ’, असे सांगितले आणि त्याचा सुपरिणामही दिसून आला, हे मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले. – संकलक)
२. पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे परिधान केल्याने त्यांचा नृत्य आणि व्यक्तीमत्त्व यांवर परिणाम होणे
मी (सौ. सोनिया) विद्यार्थिनींना नेहमी सांगते, ‘नृत्य करतांना ‘लेगिन्स’ घालू नका. ते चांगले दिसत नाही. एरव्हीही तुम्ही जीन्स (जीनच्या कापडाची पॅन्ट), शॉर्ट्स (तोकडे कपडे) घालता. त्यामुळे तुमची उभे रहाण्याची आणि चालण्याची पद्धत पालटते. तुम्ही पायांत अंतर ठेवून उभे राहिल्यामुळे तुमच्यात राकटपणा येतो. याचा प्रभाव तुमच्या नृत्यावरही पडतो आणि नृत्यामध्ये ते लालित्य (सौंदर्य) रहात नाही, जे त्यातून दिसणे अपेक्षित आहे.’
(‘व्यक्तीच्या वेशभूषेचा तिच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर परिणाम होत असतो’, हे सूत्र सनातन गेली अनेक वर्षे सांगत आहे. जीन्स, शॉर्ट्स अशा प्रकारचे पाश्चात्त्य पद्धतीच्या पोशाखांमधून रज-तम अधिक प्रमाणात प्रक्षेपित होते, तसेच पुरुषी कपडे घातल्याने स्त्रीमधील लालित्य (सौंदर्य) न्यून होते. सात्त्विक नृत्यपद्धती शिकण्यासाठी सात्त्विक पोशाखच अधिक उपयुक्त आहे. ‘सोनियाताईंचा नृत्याचा अभ्यास हा सात्त्विकतेच्या दिशेने आहे’, हे यातून स्पष्ट होते आणि ‘साधनेचे विविध मार्ग अंती एकाच विचारधारेला येऊन मिळतात’, हे यावरून लक्षात येते.’ – संकलक)
३. अभंगावर नृत्यरचना करतांना स्वतःच्या मनाला समाधान मिळेपर्यंत करत रहाणार्या सौ. सोनिया परचुरे !
संत तुकाराम महाराज यांच्या ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी…’ या अभंगावर मी पुष्कळ वेळा नृत्यरचना केली; परंतु माझे समाधान होत नसे. मला या अभंगावर ‘पुनःपुन्हा नृत्यरचना करावी’, असे वाटत असे. पूर्वी नृत्यरचना करतांना मी विठ्ठलाची मूर्ती घडवण्यापासून रचनेला प्रारंभ करत असे. या वेळी रचना करतांना मात्र ‘कुंभार मातीच्या गोळ्यापासून मडके सिद्ध करत आहे आणि त्या मडक्यामध्येच त्याला विठ्ठल दिसत आहे’, अशी नृत्यरचना केली. ‘मडक्याच्या मुखाजवळ असलेली वीण (मडक्याचा काठ) ही विठ्ठलाच्या कंठामध्ये असलेली माळ आहे’, असे दाखवले. ज्या वेळी ते मडके सिद्ध होऊन पाण्याने भरले जाते आणि तहानलेल्याच्या मुखात त्यातील पाणी पडल्यावर जीव तृप्त होतो, त्या वेळी त्या कुंभाराची अवस्था ‘तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने’, अशी होते. तो या सर्व स्थितीमध्ये विठ्ठलाला अनुभवतो. ही नृत्यरचना केल्यानंतर माझ्या मनाला फार समाधान वाटले.
(‘समाधान मिळेपर्यंत नृत्य करत रहाणे’, हे नृत्यातून स्थुलापेक्षा सूक्ष्म अनुभवण्याचा प्रयत्न करणे होय. यातून ‘सोनियाताई यांचा नृत्याचा सखोल अभ्यास आणि प्रवास हा स्थुलातून सूक्ष्माकडे जात आहे’, हे लक्षात येते.’ – संकलक)
४. नृत्य करतांना होणार्या हालचाली योग्य करवून घेणे
एकदा मी प्रभु श्रीरामाच्या एका गीतावर नृत्यरचना करत होते. त्यात ‘श्रीराम हा त्रैलोक्याचा अधिपती आहे’, असे दाखवायचे होते. स्वतः रामस्वरूप असल्याचे दाखवतांना एक विद्यार्थिनी पाताळ आणि मर्त्यलोक (पृथ्वी) व्यवस्थित दाखवत होती; पण स्वर्गलोक दाखवतांना ती हात आवश्यकतेपेक्षा अधिक वर घेत होती. ते पाहून मी तिला विचारले, ‘‘तू काय दाखवत आहेस ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘स्वर्ग दाखवत आहे.’’ तेव्हा मी तिला म्हटले, ‘‘श्रीराम स्वर्गातून नव्हे, तर त्याहीपेक्षा उच्च असलेल्या देवलोकातून (वैकुंठलोकातून) आला आहे. त्यामुळे तो स्वर्गाकडे पहातांना वर पहाणार नाही, तर खाली पाहील. परिणामी स्वर्ग दाखवतांना आपला हातही पूर्ण वर न घेता खाली असला पाहिजे.’’
(‘श्रीराम कोणत्या लोकात आहे ?’, हा शास्त्राभ्यास असल्याने सोनियाताई नृत्यातून ते अचूक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट त्यांची अध्यात्मप्रवणता दर्शवते. शास्त्राला धरून नृत्य केल्याने त्यात परिपूर्णता येऊन अधिक सात्त्विकता अनुभवता येते.’ – संकलक)
५. संगीतकाराने गीताला दिलेल्या संगीतावरून त्या गीताचा अर्थ श्रोत्याला समजत असणे
संगीतामध्ये शब्दांच्या पलीकडे जाण्याची क्षमता असते. एकदा माझी भेट एका काश्मिरी लोकसंगीतकाराशी झाली. त्याने ‘झेलम नदी’ या विषयावरील एक काव्य संगीतबद्ध केले होते. ते गीत त्याने मला ऐकवले. ते गीत काश्मिरी भाषेतील असल्यामुळे मला त्यातील शब्दांचा अर्थ कळला नाही; पण मी त्याला म्हटले, ‘‘या शब्दांचा अर्थ काय असेल, हे मी सांगण्याचा प्रयत्न करते.’’ मी त्याला सांगितले, ‘‘या गीतामध्ये झेलम नदीने आतापर्यंत काय काय पाहिले आहे, कोणकोणती दुःखे झेलली आहेत, याचे वर्णन केले आहे.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘अगदी योग्य आहे.’’ यावरून माझ्या लक्षात आले, ‘गीतातील शब्द समजत नसले, तरी संगीतकार चांगला असेल, तर त्याच्या गीतातील केवळ स्वरांवरून आणि त्याने गीताला दिलेल्या संगीतावरून त्या गीताचा अर्थ श्रोत्याला उमजतो.’
(‘संगीत हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील नादस्वरूप असल्याने त्याला भाषेचे बंधन नाही. संगीताची भाषा ही संगीतात रममाण असलेल्या कलाकाराला सहज कळू शकते. हे यातून शिकता येते.’ – संकलक)
६. कलाकाराला ‘मला जमेल’, अशी अहंयुक्त जाणीव झाली की, त्याची लय बिघडत असल्याचे गुरूंनी लक्षात आणून देणे
सुप्रसिद्ध तबलावादक पुणे येथील पंडित सुरेश तळवलकरगुरुजी यांच्यासमोर एकदा मी शिकवणीवर्गामध्ये एका मात्रेत पाच मात्रा बसवून त्या लयीचा सराव करत होते; परंतु माझी लय गुरुजींच्या पसंतीस उतरत नव्हती. ‘माझे नेमके काय चुकत आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते; म्हणून मी गुरुजींना हे विचारले, ‘‘माझे काय चुकत आहे ?’’ तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘मनुष्य प्रथम प्रयत्न करतो. प्रयत्नांमुळे त्याला यश मिळते. त्यानंतर ते यश पुनःपुन्हा मिळत रहाते आणि त्याला स्थैर्य प्राप्त होते. कलाकाराला ‘मला जमेल’, अशी अहंयुक्त जाणीव झाली की, लय बिघडते. तू आता जे नृत्य करत आहेस, ते सर्व योग्यच आहे; पण तू निव्वळ त्या लयीशी प्रामाणिक रहात नाहीस. तो प्रामाणिकपणा आला की, तुला लय साध्य करण्यामध्ये मिळत असलेले यश स्थिर होईल आणि तुझ्या लयीलाही स्थैर्य प्राप्त होईल.’’ त्या वेळी ‘असे गुरु मला लाभले आहेत, जे केवळ मला नृत्याचे शिक्षण देत नाहीत, तर माझा अहंकार दाखवून देऊन माझे नृत्य अधिक शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात’, यासाठी मला ईश्वराप्रती कृतज्ञता वाटली.
(कोणतीही साधना करतांना, साधनेत पुढे जाण्यासाठी मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होणे आवश्यक आहे. सोनियाताईंच्या वरील प्रसंगातूनही ‘त्यांची शिष्यभावात राहून नृत्याराधना चालू आहे’, हे लक्षात येते. – संकलक)
७. आजकाल बर्याचदा माझ्या मनात असा विचार येतो, ‘शुद्ध कथ्थकला तबला, पेटी आदींच्या साथीची काय आवश्यकता आहे ? कुठल्याही वाद्याची साथ न घेता केवळ नृत्य करावे.’
(‘अनेकातून एकात येणे’ हे अध्यात्माचे एक मूलभूत तत्त्व आहे. या ठिकाणी अनेक वाद्यांच्या साथीने नृत्य करणे, यापेक्षा एकटेच नृत्य करत त्यात रममाण होणे, हे अंतर्साधनेसाठी अधिक परिणामकारक आहे. सोनियाताईंचे विचारही साधनेला धरून आहेत, हे या ठिकाणी स्पष्ट होते. – संकलक)
संकलक : सुश्री (कु.) सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२२)
|