‘साधकांचे त्रास न्यून व्हावेत’, अशी तळमळ असलेले आणि स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणारे सर्वज्ञ परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘वर्ष २००४ आणि २००५ मध्ये मला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या समवेत वाहनचालक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी आम्ही ‘टाटा इस्टेट’ या पिवळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून प्रवास करत असू. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच त्यांच्यातील घडलेल्या दैवी गुणांचे दर्शन यांविषयी पुढे दिले आहे.
१. स्वतःच्या कृती स्वतःच करणे
दौर्याच्या कालावधीत मी अनेक वेळा परात्पर गुरु डॉक्टरांचे कपडे धुण्यासाठी मागत असे; मात्र ते कधीच मला कपडे धुण्यासाठी देत नसत. त्या कालावधीत ते मीठ-पाण्याचे उपाय करत. त्यासाठी ते माझ्याकडे केवळ मीठ मागून घेत आणि पुढील कृती ते स्वतः करत. अशा प्रकारे स्वतःच्या अनेक कृती स्वतःच करण्याकडे परात्पर गुरु डॉक्टरांचा कटाक्ष असे.
२. प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले !
२ अ. साधकांना त्यांच्या आवडीचा खाऊ देणे
१. ‘आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जात असू, तेथील साधकांना कोणता खाऊ आवडतो ?’, हे परात्पर गुरु डॉक्टर आवर्जून लक्षात ठेवत आणि त्यांना तो देत.
२. मला गोड पदार्थ विशेष आवडत नाही. हे त्यांना ठाऊक असल्याने ते मला नेहमी आठवणीने तिखट खाऊ द्यायचे.
२ आ. सर्वांप्रती समभाव आणि प्रीती : वर्ष २००४ मध्ये नाशिक येथे संत सत्संग होता. त्या वेळी भोजनाची व्यवस्था एका साधकाच्या घरी करण्यात आली होती. भोजनासाठी मी खाली बसण्यास सिद्ध असतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांनी मला खाली बसू दिले नाही, तर त्यांच्या शेजारीच बसण्यास सांगितले.
२ इ. साधकाने न सांगताही त्याला होणारा त्रास जाणून उपाय करायला सांगणे : दौर्याच्या कालावधीत मी थकल्यावर कधीच त्यांना काही सांगत नसे; मात्र तेच स्वतः मला ‘थकवा आल्यावर भजने लावू शकतो’, असे सांगायचे.
३. ‘साधकांचे त्रास अल्प व्हावेत’, ही तळमळ
३ अ. त्रास असणार्या साधकांना प्रवासात समवेत नेणे : अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांना परात्पर गुरु डॉक्टर आवर्जून त्यांच्या समवेत प्रवासात घेऊन जात. या कालावधीत परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास मिळाल्याने त्यांना आपोआप आध्यात्मिक लाभ होत असे.
३ आ. लांबचा प्रवास करूनही विश्रांती न घेता साधकांसाठी नामजपादी उपाय करणे : ‘गोवा ते मिरज’ असा सलग ६ घंट्यांचा प्रवास करून झाल्यावर थोडीही विश्रांती न घेता परात्पर गुरु डॉक्टर तेथील साधकांसाठी लगेच नामजपादी उपाय चालू करत. तेथे गेल्यावर प्रकृतीची काळजी न घेता ते अनेक घंटे साधकांसाठी नामजप करत. ‘साधकांचे त्रास दूर झाले पाहिजेत’, ही एकच तळमळ त्यांना होती.
४. सूक्ष्मातील गोष्टींचा अभ्यास करवून घेणे
४ अ. परात्पर गुरुदेवांच्या हाताला, तसेच त्यांच्या विविध बोटांना येणार्या सुगंधाचा अभ्यास करवून घेणे : दौर्याच्या कालावधीत एकदा आम्ही पुणे येथे डॉ. नरेंद्र दाते यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी पोचल्यावर मी परात्पर गुरुदेवांची ‘बॅग’ घेऊन ते ज्या खोलीत रहाणार होते, तेथे गेलो. तेथे जात असतांनाच मला खोलीत पुष्कळ सुगंध जाणवत होता. खाली आल्यावर परात्पर गुरुदेवांनी मला आणि दाते कुटुंबियांना ‘तुम्हाला काही जाणवते का ?’, अशी विचारणा केली. यावर दाते कुटुंबियांनी ‘थोडासा सुगंध येतो’, असे सांगितले. यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘तुला काही जाणवते का ?’, असे विचारल्यावर मी मोठ्या प्रमाणात सुगंध येत असल्याचे सांगितले. यावर त्यांनी माझे कौतुक करून ‘सूक्ष्मातील कळण्यासाठी साधना वाढवली पाहिजे’, असे दाते कुटुंबियांना सांगितले.
अशाच प्रकारे विविध दौर्यांच्या कालावधीत परात्पर गुरुदेवांच्या हाताला, तसेच त्यांच्या विविध बोटांना विविध प्रकारचे सुगंध येत असत. हे सुगंध घेण्यास सांगून ते माझ्याकडून अभ्यास करवून घेत. अशा प्रकारे अनेक छोट्या छोट्या प्रसंगांमधून ते प्रत्यक्षात ईश्वर असल्याची अनुभूती येत असे.
४ आ. कोणतेही बाह्य कारण नसतांना गाडी चालू न होणे आणि हे अनिष्ट शक्तींचे आक्रमण असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे : परात्पर गुरु डॉक्टर बेंगळुरू येथे साधकांसाठी नामजप करण्यासाठी गेले होते. त्या दिवशी सकाळी मी ‘गाडी व्यवस्थित आहे ना ? डिझेल आहे ना ?’, तसेच अन्य सर्व तपासून ठेवले होते. असे असतांना दुपारी ३ वाजता कार्यस्थळी जाण्याच्या वेळी गाडी चालूच झाली नाही. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर दुसर्या गाडीतून कार्यस्थळी गेले. नंतर त्यांनी मला ‘हे गाडीवर झालेले अनिष्ट शक्तींचे आक्रमण होते’, असे सांगितले.
५. स्वतःच्या कृतीतून शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
५ अ. प्रवासात गाडीत बिघाड झाल्याचे लक्षात येताच स्वतः गाडीतून उतरून ‘काय झाले ?’, हे पहाणे आणि त्याविषयी पुढील कृती करण्याच्या सूचना देणे : एकदा आम्ही मिरज येथून गोवा येथे जाण्यास निघालो होतो. त्या वेळी ‘टाटा इस्टेट’ या गाडीचे ‘बंपर’ निघाल्याने त्याचा आवाज होत होता. ‘आवाज येत आहे’, हे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉक्टर लगेच गाडीतून खाली उतरले आणि ‘काय झाले आहे ?’, हे त्यांनी पाहिले. अशाच प्रकारे एकदा गोवा येथे जातांना आजरा घाटातून पुढे जातांना गाडीतील ‘रेडिएटर’चे झाकण निघाल्याने त्यातून धूर येऊ लागला. त्या वेळीही परात्पर गुरु डॉक्टर तत्परतेने गाडीतून खाली उतरले आणि ‘काय झाले ?’, हे पाहून त्यांनी मला त्याविषयी पुढील कृती करण्याच्या सूचना दिल्या.
५ आ. ‘प्रवासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये’, यासाठी गाडीच्या संदर्भातील सर्व गोष्टींची पूर्तता करण्याची आठवण करून देणे : प्रत्येक वेळी कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी ‘गाडीत डिझेल आहे का ? चाकात हवा आहे का ?’, तसेच अन्य गोष्टींची ते मला आठवण करून देत. ‘पुढील प्रवासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये’, हाच त्यामागे त्यांचा उद्देश होता.
५ इ. ‘गाडीत साहित्य योग्य प्रकारे कसे ठेवायचे ?’, हे शिकवणे : गाडीतून प्रवास करतांना बर्याच वेळा आमच्या समवेत साधक, तसेच अन्य साहित्य असायचे. ‘हे सर्व साहित्य योग्य प्रकारे कसे ठेवायचे ?’, हे त्यांनी आम्हाला शिकवले. यामुळे मोठ्या प्रमाणात साहित्य असूनही गाडीत गर्दी होत नसे.
५ ई. ‘प्रत्येक कृती करण्यासाठी साधक स्वयंपूर्ण झाला पाहिजे’, याकडे कटाक्ष असणे : दौर्याच्या कालावधीत अनिष्ट शक्तींचे आक्रमण झालेल्या विविध वस्तू, चित्रे, कपडे यांचे प्रदर्शन सिद्ध करण्यात आले होते. ते प्रदर्शन प्रारंभी परात्पर गुरु डॉक्टर स्वतः लावत. नंतर माझ्याकडून प्रदर्शन लावण्याची कृती ते करवून घेऊ लागले. मला प्रदर्शन लावण्यासाठी जमू लागल्यावर अन्यत्र मार्गदर्शनाच्या कालावधीत मीच ते प्रदर्शन लावू लागलो. अशा प्रकारे ‘प्रत्येक कृती करण्यासाठी साधक स्वयंपूर्ण झाला पाहिजे’, याकडे त्यांचा कटाक्ष असे.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्री. महेश पेडणेकर, कोल्हापूर सेवाकेंद्र (२७.३.२०२०)