हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना देण्यात आली विविध विषयांवरील निवेदने !
मुंबई, ३ जानेवारी (वार्ता.) – येथे डिसेंबर मासात राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना विविध विषयांवरील निवेदने देण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, यांच्यासह मुंबई-ठाणे-रायगड जिल्हा समन्वयक सागर चोपदार आणि मुंबईचे समन्वयक बळवंत पाठक आदी उपस्थित होते. या वेळी आमदारांनी समितीच्या निवेदनांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याविषयीचे संक्षिप्त विवरण येथे देत आहोत…
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात लक्ष घालीन ! – दौलत दरोडा, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार दौलत दरोडा यांना हिंदु जनजागृती समितीचे सागर चोपदार यांनी विशाळगडावरील अतिक्रमण या विषयाचे निवेदन दिले. या विषयासंदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन आमदार दौलत दरोडा यांनी दिले. यासमवेत हलाल प्रमाणपत्राविषयी व्यापार्यांची बैठक घेण्याचे निश्चित केले, तसेच मुख्यमंत्री आणि संस्कृतीमंत्री यांनाही याविषयी बैठक घेण्याविषयी पत्र दिले.
विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय गंभीर ! – संजय पोतनीस, आमदार, शिवसेना
मुंबईतील कलिना मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांची हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि बळवंत पाठक यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांना विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार पोतनीस आणि सुनील घनवट यांची याविषयी चर्चाही झाली, त्या वेळी आमदार पोतनीस यांनी सांगितले की, विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय गंभीर आहे, मी त्यात लक्ष घालीन.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार ! – महेश शिंदे, आमदार, शिवसेना
कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमण हटवणे, विजयदुर्ग किल्ला आणि लोकमान्य टिळक यांचे स्मारक या विषयांचे निवेदन देण्यात आले. या वेळी महेश शिंदे यांनी ‘गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे, त्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि सागर चोपदार आदी उपस्थित होते.
पारोळा किल्ल्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना स्वतः निवेदन देईन ! – राजूमामा भोळे, आमदार, भाजप
जळगाव येथील भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांची समितीचे सुनील घनवट आणि प्रशांत जुवेकर यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये विशाळगड, पारोळा आणि विजयदुर्ग या किल्ल्यांविषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, पारोळा किल्ला हा आमच्या जिल्ह्यातील असून यासंदर्भात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना पत्र पाठवतो, तसेच जिल्हाधिकार्यांच्या समवेत एकत्रित बैठकीचे आयोजन करून मी स्वतः त्यांना निवेदन देईन.
भाजपचे आमदार अधिवक्ता राहुल ढिकले आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना समितीकडून निवेदन !
भाजपचे आमदार अधिवक्ता राहुल ढिकले आणि अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना समितीच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याविषयी आणि हलाल प्रमाणपत्र रहित करण्याविषयी निवेदन देण्यात आले. त्यानंतर आमदार ढिकले यांनी त्यांच्या लेटरहेडवर याविषयीची बैठक घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही या विषयासंदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकार्यांच्या समवेत विशाळगडाच्या संदर्भात एका आठवड्यात आढावा बैठक घेऊ ! – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे आश्वासन
विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, पुरातत्व खात्याचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी मुंबई येथे विधानसभा अधिवशेनाच्या कालावधीत विविध मंत्री आणि आमदार यांच्या भेटी घेऊन निवेदन सादर केले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले ‘‘कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्यांच्या समवेत विशाळगड येथील अतिक्रमण आणि अन्य दुरवस्था या संदर्भात एक आठवड्यात आढावा बैठक घेऊ. या बैठकीत आतापर्यंत कोणत्या कृती झाल्या याचा आढावा घेऊ.’’ या वेळी सागर चोपदार आणि बळवंत पाठक उपस्थित होते.