एन्.सी.बी.विरुद्ध बोलण्यासाठी नवाब मलिक यांचा दबाव ! – भाजपचे नेते मोहित कंबोज यांची माहिती

नवाब मलिक आणि भाजपचे नेते मोहित कंबोज

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या  (एन्.सी.बी.) विरुद्ध बोलण्यासाठी धमकावल्याचा आरोप अरबाज उकानी यांनी केला आहे. उकानी हे अमली पदार्थ प्रकरणातील साक्षीदार आहेत. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

कंबोज यांनी एक स्क्रिनशॉट शेअर करत ’हा पहा नवाब मलिक यांचा फर्जिवाडा’ असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यामध्ये एक ई-मेल असून तो मुंबई पोलीस आयुक्तांना करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये उकानी यांनी ते अमली पदार्थ प्रकरणातील साक्षीदार असल्याचे म्हटले आहे. ‘‘आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी मला प्रसार माध्यमांसमोर बोलण्याची धमकी दिली आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या विरुद्ध बोलण्यासाठी ३० लाख रुपयांचे आमीष (ऑफर) देण्यात आले आहे. तसेच केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या विरुद्ध बोला अन्यथा भयंकर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली आहे. कृपया मला साहाय्य करा. माझ्या जिवाला धोका आहे’’, असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे, असा दावा कंबोज यांनी केला आहे.