सातारा नगरपालिकेच्या थकबाकीदारांची मालमत्ता ‘सील’ करण्याचे मुख्याधिकार्यांचे आदेश
सातारा, २ जानेवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी १ जानेवारी या दिवशी वसुली विभागाची बैठक घेतली. या वेळी घेतलेल्या आढाव्यामध्ये पालिकेची वसुली केवळ १३ टक्क्यांवर येऊन ठेपल्याचे निदर्शनास आले. यावर तीव्र संताप व्यक्त करत थकीत करदात्यांना थेट ‘वॉरंट’ पाठवा अन् वसुली करा. अन्यथा मालमत्ता ‘सील’ करा, असे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले आहेत.
या बैठकीला वसुली विभागातील अधिकारी उपस्थित होते. सातारा नगरपालिकेची एकूण थकबाकी ४४ कोटी रुपये असून दावे आणि अपिल यांमधून १० कोटी रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित ३४ कोटी रुपयांपैकी ९ कोटी ७८ लाख रुपये वसुली विभागाने वसूल केले आहेत. आता राहिलेल्या २४ कोटी २२ लाख रुपयांपैकी अधिकाधिक वसुलीचे उद्दीष्ट अधिकार्यांना देण्यात आले आहे. वर्ष २०१४ नंतर ज्या मालमत्ता नव्याने सीमावाढ झालेल्या भागांसह मूळ गावठाणमध्ये उभ्या राहिल्या आहेत, त्या सर्व मिळकतधारकांना १५ जानेवारीपर्यंत घरपट्टी देयके देण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यासाठी ४ पथके नियुक्त करण्यात आली असून ३ जानेवारीपासून त्यांचे कार्य चालू होईल.