काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
कोल्हापूर, २ जानेवारी (वार्ता.) – कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने केवळ एक जागा अधिक मागितली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिल्यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ यांसह इतर सहकारी संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साहाय्य केले. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसमवेत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिल्हा बँकेत सध्या खासदार प्रा. संजय मंडलिक आणि माजी खासदार निवेदिता माने हे दोन विद्यमान संचालक आहेत. या दोन जागा वगळता आम्ही आणखी एक जागा अधिक मागत होतो. गटाविषयी आमचा कोणताही आग्रह नव्हता. कोणत्याही गटातील द्या; पण शिवसेनेला आणखी एक ागा हवी होती. असे असतांना राजकारणात विश्वासघाताची परंपरा असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माघारीची समयमर्यादा संपण्याआधी काहीकाळ शिवसेनेला जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकवटले अन् पुढाकार घेऊन ‘पॅनेल’ सिद्ध केले.