थकबाकी असलेल्यांच्या हाती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सूत्रे गेल्याचे दु:ख ! – सतीश सावंत, शिवसेना नेते
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (जिल्हा बँकेचे) नेतृत्व ज्यांनी बँकेचे कर्ज थकित ठेवले आहे, त्यांच्याकडे गेले आहे. या व्यक्तींनी बोलोरे गाड्यांसाठी घेतलेले, तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी घेतलेले पैसे भरले नाहीत. ज्यांच्याकडे बँकेची थकित रक्कम आहे, अशांच्या नेतृत्वाखाली त्यांचे लोक निवडून येतात याचे दु:ख आहे. मला पराभवाचे दु:ख नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते, तसेच जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पराभव झालेले उमेदवार सतीश सावंत यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल ३१ डिसेंबरला घोषित झाला. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार निवडण्यात आला. यामध्ये भाजपचे देसाई विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सावंत म्हणाले, ‘‘या निवडणुकीत धनशक्ती आणि बळ यांचा वापर केला गेला. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर आक्रमण करून ‘आमच्यासोबत राहिला नाहीत, तर तुमचाही संतोष परब होईल’, अशी भीती मतदारांमध्ये निर्माण केली गेली. केंद्रीय मंत्र्याला माझ्या मतदारसंघात ४ दिवस थांबून रहावे लागले. ते ज्या २० मतदारांना भेटले, त्यातील १७ मते मला पडली. चांगले काम करूनही पराभव होतो, याचे दु:ख आहे. आमचे निवडून आलेले ८ संचालक अनुभवी असून निश्चितपणे ते बँकेच्या कारभारावर अंकुश ठेवतील.’’