मालवण येथे मासेमारी कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्या मासेमारांचे साखळी उपोषण चालू
मालवण – महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मरिन फिशिंग रेग्युलेशन अॅक्ट १९८१ मध्ये २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सुधारणा केली आहे. या कायद्यामुळे यांत्रिक नौकेद्वारे (पर्ससीन नेटद्वारे) मासेमारी करणार्यांवर अन्याय होणार आहे. या कायद्याच्या सुधारणेतील सर्व अटी आणि दंड पहाता ही सुधारणा मासेमारांच्या मुळावर येणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मासेमारी करण्याच्या सर्व प्रकारांचा अभ्यास केल्याशिवाय या कायद्याची कार्यवाही करू नये, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्यांनी १ जानेवारी २०२२ पासून येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण चालू केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकार (पर्ससीन) असोशिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी अशोक सारंग, कृष्णनाथ तांडेल, सतीश आचरेकर, रुजारिओ पिंटो, सहदेव बापर्डेकर, रेहान शेख, मुजफ्फर मुजावर, गोपीनाथ तांडेल यांच्यासह मालवण, देवगड, वेंगुर्ले येथील पर्ससीनधारक उपस्थित होते.