शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !
सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !
‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. मागील लेखात आपण ‘स्वरसंधी’चे तीन प्रकार पाहिले. आजच्या लेखात त्यापुढील प्रकार जाणून घेऊ.
(लेखांक ७ – भाग ३)
लेखांक ७. भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/538275.html
४. संधीचे प्रकार
४ अ २. स्वरसंधीचे प्रकार
(टीप : स्वरसंधीच्या ‘४ अ २ अ’ ते ‘४ अ २ इ’ या प्रकारांची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवार, २६ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
४ अ २ ई. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ऋ’ हा स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ऋ’ हा स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना त्या दोहोंऐवजी ‘अर्’ हे एकच अक्षर येते, उदा. ‘देव + ऋषि = देवर्षि’ या संधीमध्ये ‘देव’ या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात ‘अ’ हा स्वर समाविष्ट आहे आणि ‘ऋषि’ या शब्दाचे पहिले अक्षर ‘ऋ’ हा स्वर आहे. ‘अ + ऋ’ यांचा संधी झाल्यावर ‘अर्’ हे अक्षर सिद्ध होते’, या नियमानुसार ‘देवर्षि’ या शब्दातील ‘र्षि’ हे अक्षर सिद्ध झाले आहे. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ अ २ उ. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ए’ किंवा ‘ऐ’ हे स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ए’ किंवा ‘ऐ’ हे स्वर आल्यास संधी होतांना त्या दोहोंबद्दल ‘ऐ’ हा एकच स्वर येतो. या प्रकारचे संधी अधिकतर संस्कृत भाषेत होतात. या संधींची मराठी भाषेत प्रचलित असलेली काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ अ २ ऊ. ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ओ’ किंवा ‘औ’ हे स्वर येणे : ‘अ’ किंवा ‘आ’ या स्वरांपुढे ‘ओ’ किंवा ‘औ’ हे स्वर आल्यास संधी होतांना त्या दोहोंबद्दल ‘औ’ हा एकच स्वर येतो. या संधीची मराठी भाषेत प्रचलित असलेली काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ अ २ ए. ‘इ’ किंवा ‘ई’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणताही स्वर येणे : ‘इ’ किंवा ‘ई’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणताही स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना ‘इ’ किंवा ‘ई’ हे स्वर लोप पावतात आणि त्यांच्याबद्दल ‘य्’ हे अक्षर येते. असा संधी होऊन जोडशब्द सिद्ध होण्याची प्रक्रिया अन्य संधींपासून जोडशब्द सिद्ध होण्याच्या प्रक्रियेपेक्षा थोडी निराळी आहे. या प्रक्रियेचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
‘अती + आधुनिक = अत्याधुनिक’ या संधीमध्ये ‘अती’ या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात ‘ई’ हा स्वर समाविष्ट आहे आणि ‘आधुनिक’ या शब्दाचे पहिले अक्षर ‘आ’ हा स्वर आहे; मात्र ‘ई + आ = या’ अशी या संधीची फोड होत नाही. त्याऐवजी ती ‘ई + आ = य् + आ = या’ अशी होते, म्हणजे संधी होतांना पहिल्या टप्प्यावर ‘य्’ हे अक्षर सिद्ध होते. त्यानंतर त्या ‘य्’मध्ये पुढील ‘आधुनिक’ या शब्दातील ‘आ’ मिसळतो आणि ‘या’ हे पूर्ण अक्षर सिद्ध होते. अशा प्रकारे ‘अत्याधुनिक’ या शब्दातील ‘त्या’ हे अक्षर सिद्ध झाले आहे. याला संस्कृत भाषेत ‘यणादेश’ असे म्हणतात. या संधीची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ अ २ ऐ. ‘उ’ किंवा ‘ऊ’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणतेही स्वर येणे : ‘उ’ किंवा ‘ऊ’ या स्वरांपुढे हे दोन्ही स्वर वगळून अन्य कोणतेही स्वर आल्यास त्यांचा संधी होतांना ‘उ’ किंवा ‘ऊ’ हे स्वर लोप पावतात आणि त्यांच्याबद्दल ‘व्’ हे अक्षर येते. हा संधी होण्याची प्रक्रियाही वरील सूत्र क्र. ‘४ अ २ ए’ याप्रमाणेच आहे. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
टीप १ – या ठिकाणी संधी करतांना आपण ‘अंतर’ या शब्दातील ‘अं’ हे अक्षर घेण्याऐवजी ‘अ’ हे अक्षर घेतले आहे; कारण ‘अं’चा उच्चार केल्यास आधी ‘अ’ हा स्वर उच्चारला जातो आणि नंतर अनुस्वाराचा उच्चार होतो.’
(क्रमशः पुढील रविवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२१)