यावल (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्यावर शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांचे ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य नष्ट न होण्यासाठी प्रबोधन !
जळगाव, १ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबरला रात्री कथित नववर्षाच्या नावाखाली ऐतिहासिक गड-किल्ले अशा ठिकाणी मद्यपान, मेजवान्या करणे हे प्रकार वाढले आहेत. यामुळे एकप्रकारे या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य नष्ट केले जात आहे. ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य अबाधित रहावे, यासाठी शासन-प्रशासन यांनी योग्य ती नियमावली करून अशी कृती करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावल शहरातील शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी युवकांनी केली. यावल येथील भुईकोट किल्ल्यावर या युवकांनी हे प्रबोधन अभियान राबवले. हातात प्रबोधनपर फलक घेऊन त्यांनी समाजबांधवांना याविषयी जागृत केले. ‘हिंदु बांधवांनी नववर्ष साजरे केले पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
यावल शहरातील सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी आणि आपले ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती शिवभक्त डॉ. अभय रावते, धनंजय बारी, नीलेश पाटील, पवन खर्चे, लोकेश लाड, अधिवक्ता गोविंदा बारी, सिद्धेश श्रावगी, आयुष वाणी, दीपक बारी, मयूर महाजन, ज्ञानेश्वर जाधव, दीपक कोळी, विशाल भोई, बंटी बारी, विशाल बारी, चेतन भोईटे, हर्षवर्धन भोईटे, पियुष भोईटे, हेमंत बडगुजर आदींनी केली.
यावल किल्ल्याकडे सरकार आणि प्रशासन यांनी लक्ष द्यावे ! – धर्मप्रेमींची मागणीयावलचा भुईकोट किल्ला ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीकडे जायला हवा; पण या किल्ल्याकडे दुर्लक्ष होत आहे. झाडाझुडपांचे प्रमाण वाढले आहे, किल्ल्याच्या काही बांधकामांची पडझड झाली आहे. त्यामुळे या किल्ल्याकडे सरकार आणि प्रशासन यांनी लक्ष द्यायला हवे, अशी मागणी आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) |