सनातन धर्माची तत्त्वे आणि परंपरा विश्वात आध्यात्मिक स्तरावर सकारात्मकता वाढवण्यात साहाय्य करू शकतात ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा
‘भारतीय प्रबंध संस्थान (IIM), कोझिकोड, केरळ’ येथे आयोजित कार्यक्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाची आधुनिक युगासाठी उपयुक्तता’ या विषयावरील संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आहेत सहलेखक ! |
मुंबई – अनेक शतकांपासून भारत वेद, उपनिषदे आणि श्रीमद्भगवद्गीता यांसारख्या धर्मग्रंथांसह वैज्ञानिक विचारांतून जगाला दिलेल्या समृद्ध ज्ञानासाठी ओळखला जातो. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, शून्याची संकल्पना आणि प्रकाशाच्या गतीचे मोजमापन आदी संकल्पना प्राचीन भारतीय ज्ञानातील आहेत, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते ‘भारतीय प्रबंध संस्थान (IIM), कोझिकोड, केरळ’ यांनी आयोजित केलेल्या ‘द इंटरनॅशनल कॉनक्लेव्ह ऑन ग्लोबलायझिंग इंडियन थॉट २०२१’ या कार्यक्रमात ऑनलाईन सादरीकरण प्रस्तुत करतांना बोलत होते. श्री. क्लार्क यांनी ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाची आधुनिक युगासाठी उपयुक्तता’, हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले या शोधनिबंधाचे लेखक असून श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
१. श्री. क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे प्रभावळ मापक उपकरण वापरून केलेल्या काही चाचण्यांची माहिती दिली.
२. एका चाचणीत एका महिलेने विविध प्रकारचे कपडे परिधान केल्यानंतर ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण वापरून तिची प्रभावळ मोजण्यात आली. सर्व कपड्यांमध्ये नऊवारी आणि सहावारी साडी नेसल्यानंतर महिलेतील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक वाढली होती, तर अन्य कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा होती.
३. पांढरा शर्ट-पँट आणि काळा शर्ट-पँट परिधान केलेल्या महिलेच्या चाचणीत असे दिसून आले की, पांढर्या कपड्यांच्या तुलनेत, काळ्या कपड्यांचा तिच्यावर पुष्कळ अधिक प्रमाणात नकारात्मक परिणाम झाला आहे.
४. तसेच जगात सर्वाधिक वापरल्या जाणार्या १९ भाषांसंदर्भात केलेल्या तुलनात्मक अभ्यासामध्ये संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी यांमध्ये सर्वाधिक सकारात्मक स्पंदने आढळून आली.
५. ३४ देशांतील माती आणि पाणी यांच्या नमुन्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर केवळ भारतातील नमुन्यांमध्ये आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मक ऊर्जा असल्याचे दिसून आले.
६. भारतीय शास्त्रीय संगीतातील राग उच्च रक्तदाब आणि मधुमेह न्यून करण्यासाठी, तसेच रुग्णाची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.
निष्कर्ष
एकूणच भारतीय पारंपरिक आचार, तत्त्वे, परंपरा आणि आधुनिक आचार यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता ‘भारतीय परंपरा विश्वात आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ सकारात्मकता निर्माण करतात आणि पर्यायाने व्यक्ती अन् वातावरण यांवर सकारात्मक प्रभाव टाकतात, तर ‘आधुनिक आचारां’मुळे आध्यात्मिक स्तरावर नकारात्मकता वाढते’, असे आढळून आले.