अखिल मानवजातीला परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी अद्वितीय ग्रंथकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी लावलेल्या ग्रंथरूपी रोपट्याचे केवळ २६ वर्षांमध्ये ३५० ग्रंथरूपी वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. आणखी ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील इतके लिखाण संगणकात आहे. सप्टेंबर २०२१ पासून सनातन संस्था राबवत असलेल्या ‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत सनातनच्या ग्रंथांचा भारतभर व्यापक प्रमाणावर प्रसार केला जात आहे. या अभियानाला सर्वत्रच उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या अभियानाच्या अंतर्गत अवघ्या ३ मासांतच मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या ५ भाषांतील ३,५८,९८० ग्रंथांची विक्री झाली आहे ! हे अभियान चालू असतांनाच सनातनचा ३५० (योगतज्ञ दादाजी वैश्यंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत हा ग्रंथ) वा ग्रंथ प्रकाशित होणे, हा दुग्धशर्करायोगच आहे.

पू. संदीप आळशी

‘ईश्वरी नियोजनानुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल आणि नंतर अनंत काळ सनातनचे ग्रंथ वेदांसारखे ‘धर्मग्रंथ’ म्हणून मान्यता पावतील’, असा आशीर्वाद ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’द्वारे महर्षींनी दिला आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या दैदीप्यमान ग्रंथकार्याचा संपूर्ण भारतवर्षालाच अभिमान वाटला पाहिजे.

‘अखिल मानवजातीला या ज्ञानगंगेत न्हाऊन निघून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेता यावे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक

(१५.१२.२०२१)


या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/538261.html


७. ग्रंथांतील ज्ञानाला नियतकालिके, सामाजिक माध्यमे इत्यादींद्वारे प्रसिद्धी !

७ अ. सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान प्रसिद्ध करणारी संकेतस्थळे

१. sanatan.org (मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, मल्याळम्, नेपाळी आणि इंग्रजी या भाषांत)

२. hindujagruti.org (मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांत)

३. Balsanskar.com (मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड)

४. spiritualresearchfoundation.org (इंग्रजी, चिनी, पारंपरिक चिनी, फ्रेंच, डच, स्पॅनिश, क्रोएशियन, सर्बियन, रशियन, स्लोव्हेन्सिना, मलय (मलेशियन), इटालियन, इग्बो, हंगेरियन, पोर्तुगीज, इंडोनेशियन, मॅसडोनियन, बल्गेरीयन, व्हिएतनामी, रोमाना आणि नेपाळी या २२ विदेशी भाषांत, तसेच हिंदी आणि तमिळ या २ भारतीय भाषांत)

५. spiritual.university (Maharshi University of Spirituality) : इंग्रजी भाषेत

७ आ. ‘यू ट्यूब’वरून प्रसार :www.youtube.com/user/Dharmashikshan’ या मार्गिकेवरील (‘लिंक’वरील) ‘धर्मशिक्षा’ वाहिनीवर (‘चॅनेल’वर) ‘गुढी कशी उभारावी ?’, ‘गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी कसे साजरे करावेत ?’, ‘होळीचे पूजन कसे करावे ?’ यांसारख्या विषयांवरील मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्ल्याळम् आणि तमिळ या भाषांतील दृश्यपट (व्हिडिओज्) उपलब्ध आहेत. ११.५.२०११ या दिवशी चालू झालेल्या या ‘यू ट्यूब वाहिनी’ला भेट दिलेल्यांची संख्या नोव्हेंबर २०२१ पर्यंत ४१,१८,००० हून अधिक आहे.

७ इ. सामाजिक माध्यमांद्वारे (‘सोशल मीडिया’द्वारे) प्रसार : ‘ट्विटर’, ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘टेलिग्राम’ या सामाजिक माध्यमांद्वारे सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रतिमास सहस्रावधी लोकांपर्यंत पोचते.

७ ई. ‘ॲन्ड्रॉइड ॲप्स्’द्वारे प्रसार : ‘बालसंस्कार’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘सनातन संस्था’, ‘सनातन प्रभात नियतकालिक’, ‘आपत्कालीन सुरक्षा’ आणि ‘श्राद्धविधी’ या ‘ॲन्ड्रॉइड ॲप्स्’द्वारेही सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रतिमास सहस्रावधी लोक वाचतात.

८. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने ग्रंथांचे अनन्यसाधारण महत्त्व !

धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून कार्य होण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’ !

– (पू.) संदीप आळशी (१५.१२.२०२१)

९. परात्पर गुरु डॉक्टरांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या तात्कालिक कार्यातील सहभाग लौकिकार्थाने फारसा दिसत नसण्यामागील कारण म्हणजे, ते करत असलेले ग्रंथकार्य !

‘काही हिंदुत्वनिष्ठांनी मला विचारले, ‘‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात तुमचा सहभाग का दिसत नाही ?’’ त्यांनी साधना केलेली नसल्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावर उत्तर न देता मी शारीरिक स्तरावरचा विचार करून म्हणालो, ‘‘आता माझे वय ७८ वर्षे असल्यामुळे शरीर थकले आहे. त्यामुळे मला बाहेर जाऊन कार्य करता येत नाही.’’

त्यांच्या प्रश्नाचे आध्यात्मिक स्तरावरील उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

अ. ईश्वरी नियोजन आणि कालमाहात्म्य यांनुसार हिंदु राष्ट्राची स्थापनेचा आरंभ वर्ष २०२५ मध्ये होणार आहे. त्यामुळे आता मी काही करण्याची आवश्यकता नाही. मी सिद्ध (तयार) केलेले साधक हे कार्य करत आहेत.

आ. पुढे स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्रातील हिंदू आणि जिज्ञासू यांना आध्यात्मिक स्तरावरील वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादींच्या वाचनाने हिंदु धर्म कळणार नाही; कारण त्यांचे विचार बुद्धीच्या स्तरावर असणार आहेत आणि अध्यात्म बुद्धीच्या पलीकडील आहे. त्या काळात अध्यात्म कळावे; म्हणून बुद्धीच्या स्तरावर ते अधिकाधिक समजावे, यासाठी मी लिखाण करत असलेल्या ग्रंथांत विज्ञानाच्या भाषेत अध्यात्म सांगितले आहे.

इ. सनातनचे सर्वच ग्रंथ जिज्ञासूंना पुढे काही सहस्रो वर्षे अध्यात्म शिकण्यास उपयुक्त ठरतील. ऋषिमुनींनी पूर्वी लिहिलेले ग्रंथ सहस्रो वर्षांनंतर आजही समाजाला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतात. संत तुलसीदास, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, संत कनकदास, संत पुरंदरदास, श्री राघवेंद्रस्वामी, संत नरसी मेहता इत्यादींनी लिहिलेले साहित्य कित्येक वर्षांनंतर आजही मार्गदर्शक आहे. त्याप्रमाणे मी संकलित केलेले ग्रंथ हिंदु राष्ट्रातील हिंदूंनाच नाही, तर जगातील साधकांना मार्गदर्शक ठरतील.

यावरून ‘तात्कालिक महत्त्वाच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मी उर्वरित आयुष्य देण्यापेक्षा ते ग्रंथांच्या संकलनाच्या सेवेसाठी देणे किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२.८.२०२०)

१०. ग्रंथांच्या माध्यमातून होणार्‍या धर्मप्रसारकार्यात सहभागी होणार्‍यांवर परात्पर गुरु डॉक्टरांची अपार कृपा होणार असणे

‘सूत्र ‘८’ आणि ‘९’ यांवरून हे लक्षात येते की, ‘ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ साधना आहे. हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे. यासाठीच ‘आपत्काळापूर्वी अधिकाधिक ग्रंथ प्रसिद्ध व्हावेत’, ही परात्पर गुरु डॉक्टरांची आत्यंतिक तळमळ आहे. या तळमळीपोटी ते आजही प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी एकप्रकारे त्यांचा संकल्पच झालेला आहे. परात्पर गुरु डॉक्टरांसारख्या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून साधकांनीही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होईल.

ग्रंथनिर्मितीची सेवा करणार्‍यांप्रमाणेच ग्रंथांचा प्रसार करणारे, ग्रंथांसाठी अर्पण मिळवणारे, ग्रंथांचे वितरण करणारे अशा सर्वांनाच साधनेची अपूर्व सुवर्णसंधी लाभली आहे. सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !’

– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (१५.१२.२०२१)

ग्रंथनिर्मितीची सेवा करू इच्छिणार्‍यांनी पुढील माहिती कळवावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी नोव्हेंबर २०२१ पर्यंत ३५० ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. ग्रंथनिर्मितीची सेवा शिकण्यासाठी संगणकाचे जुजबी ज्ञान आणि संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. अशा इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २ – ३ आठवडे रहाता येईल. पुढे त्यांना सनातनच्या आश्रमात किंवा घरी राहूनही सेवा करता येतील. इच्छुकांनी पुढील सारणीनुसार स्वतःची माहिती सनातनच्या साधकांना संगणकीय धारिकेच्या किंवा लिखित स्वरूपात द्यावी आणि साधकांनी ती माहिती आपल्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून माझ्या नावे sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री संदीप सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन 403 401

भ्र.क्र. – 7058885610

– सौ. भाग्यश्री संदीप सावंत (१५.१२.२०२१)