सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना दिलेली भेट !
‘१७.१२.२०२१ या दिवशी सुप्रसिद्ध गायक श्री. महेश काळे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना भेट दिली. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधनाचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून दीड घंटा आम्हाला दिला. त्यांच्या या भेटीचा वृत्तांत पुढे दिला आहे.
१. श्री. महेश काळे यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत चालू असलेल्या संगीत संशोधनाविषयी लघुसंदेश पाठवल्यावर त्यांनी त्याला त्वरित प्रतिसाद देणे
१३.११.२०२१ या दिवशी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांचे यू ट्यूबवरील एक चलचित्र (व्हिडिओ) पाहून माझ्या मनात ‘त्यांच्याशी बोलायला मिळावे’, अशी इच्छा तीव्रतेने निर्माण झाली आणि मी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयांतर्गत चालणार्या संगीतातील संशोधन कार्याविषयीचा लघुसंदेश केला. त्यात मी त्यांना ‘आम्हाला आपल्याशी बोलायला मिळेल का ?’, असे विचारले. त्यावर त्यांनी मला लगेच प्रतिसाद देत त्यांच्या कार्यालयाचा ‘ई-मेल’ पत्ता पाठवला.
२. श्री. महेशजी यांच्या ‘ई-मेल’ पत्त्यावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याची माहिती पाठवल्यावर त्यांच्या व्यवस्थापक निधी यांनी ‘श्री. महेशजी तुमच्याशी बोलणार आहेत’, असे सांगणे
श्री. महेशजी यांनी दिलेल्या ‘ई-मेल’ पत्त्यावर मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयांतर्गत होणार्या ‘संगीत’ या विषयावरील कार्याचे माहितीपत्रक आणि संगीत कलाकारांचे लेख इत्यादी पाठवले. श्री. महेशजींच्या मुंबई येथील व्यवस्थापक असलेल्या निधी यांनी मला दूरभाष करून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सर्व कार्य जाणून घेतले. ‘श्री. महेशजींनी आम्हाला संगीताविषयी मार्गदर्शन करावे आणि आम्हाला त्यांच्याशी वार्तालाप करता यावा’, यासाठी मी निधी यांना विनंती केली. तेव्हा त्यांनी सर्व कार्य आणि माझे अन् त्यांचे झालेले संभाषण श्री. महेशजींना सांगितले. काही दिवसांनी त्यांनी ‘श्री. महेशजी तुमच्याशी बोलू इच्छितात’, असे मला कळवले.
३. श्री. महेशजी यांचा गोव्यामध्ये कार्यक्रम होणार असल्याचे कळणे आणि तेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याविषयी विचारल्यावर निधी यांनी श्री. महेशजी आश्रमात येणार असल्याचे सांगणे
१८.१२.२०२१ या दिवशी श्री. महेशजींचा गोव्यामध्ये कार्यक्रम असल्याचे त्यांच्या व्यवस्थापक निधी यांच्या बोलण्यातून मला कळले. तेव्हा मी श्री. महेशजींना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. निधी यांना कार्य आवडले असल्याने ‘मी तसा पूर्ण प्रयत्न करणार आहे’, असे त्यांनी मला सांगितले. काही दिवसांनी त्यांनी ‘श्री. महेशजी आश्रमात येतील’, असे मला कळवले.
४. श्री. महेश काळे यांनी रामनाथी आश्रम आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना दिलेली भेट !
४ अ. श्री. महेश काळे आणि त्यांचे बंधू श्री. मंदार काळे यांनी आश्रम पहातांना जिज्ञासेने प्रश्न विचारणे : १७.१२.२०२१ या दिवशी श्री. महेश काळे आणि त्यांचे बंधू श्री. मंदार काळे हे रामनाथी आश्रमात आले. त्यांना अल्प वेळेत थोडक्यात आश्रम दाखवण्यात आला. आश्रम दाखवतांना श्री. महेशजींनी ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेच्या ठेवलेल्या छायाचित्रांविषयी माहिती जाणून घेतली, तसेच ‘कलेच्या संदर्भात सेवा करणारे साधक विविध कलाकृती सात्त्विक पद्धतीने कशा बनवतात ? सात्त्विक आणि असात्त्विक कलाकृती’, यांविषयीही जिज्ञासेने प्रश्न विचारून समजून घेतले.
४ आ. आश्रम पाहिल्यानंतर श्री. महेशजींनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या कार्याविषयी जाणून घेतले.
४ इ. विविध आधुनिक उपकरणे वापरून केलेल्या विविध विषयांवरील संशोधनाचे कार्य जिज्ञासेने जाणून घेणे : त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांनी विविध आधुनिक उपकरणे वापरून केलेल्या विविध विषयांवरील संशोधनाचे कार्य ‘प्रोजेक्टर’वर दाखवले. श्री. महेशजींनी संगीत, मंत्र, यज्ञयाग, विविध ठिकाणचे पाणी अन् माती, विविध व्यक्ती इत्यादींचा सात्त्विकता आणि असात्त्विकता यांच्या दृष्टीने केलेला अभ्यास जाणून घेतला.
४ ई. ‘काळाच्या गतीला धरून संशोधन अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी आधुनिक उपकरणे शोधून ठेवायला हवीत’, असे श्री. महेशजींनी सांगणे : आम्ही श्री. महेशजींना ‘संशोधनाविषयी आम्ही आणखी काय करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमचे संशोधन चांगलेच आहे. ‘पुढच्या २५ – ५० वर्षांनंतरही आपण याचा अधिक सखोल अभ्यास करू शकू’, अशी काही आधुनिक उपकरणे आपण आताच शोधून ठेवू शकलो, तर हे संशोधन काळाच्या गतीला धरून अधिक चांगले करू शकू.’’
५. श्री. महेश काळे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
५ अ. नम्र : श्री. महेशजी आम्हाला म्हणाले, ‘‘मीही एक छोटासा साधक आहे. मलाही आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे.’’ त्यांच्या या बोलण्यातून त्यांची नम्रता माझ्या लक्षात आली.
५ आ. प्रांजळ : संशोधनाच्या कार्यातील कलाकारांचा अहंकार वाढण्याच्या संदर्भातील एक सूत्र आल्यावर ‘अहं वाढू नये’, यासाठीही मीही काळजी घेतो’, असे त्यांनी प्रांजळपणे आम्हाला सांगितले.
५ इ. अभ्यासू वृत्ती : ‘साधना’ हा विषय समजून घेतांना त्यांनी आम्हाला विविध प्रश्न विचारले. यावरून त्यांची अभ्यासू वृत्ती आमच्या लक्षात आली. त्यांनी आश्रम आणि संशोधन कार्य वरवर न पहाता ते अभ्यासूपणाने पाहिल्याचे आमच्या लक्षात आले.
५ ई. सर्वांना त्वरित प्रतिसाद देऊन जवळीक साधणारे श्री. महेश काळे आणि त्यांचे व्यवस्थापन ! : श्री. महेशजी हे सामान्य लोकांनी केलेल्या लघुसंदेशालाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि त्यांचे त्वरित उत्तरे देणारे व्यवस्थापनही फार चांगले आहे’, असे त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून माझ्या लक्षात आले. महेशजी लोकांनी केलेल्या लघुसंदेशाला लगेच प्रतिसाद देत असल्यामुळे लोकही त्यांच्याशी लगेच जोडले जातात. मला त्यांची ही कृती प्रशंसनीय वाटली.
५ उ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य एकाग्रतेने जाणून घेतांना मनापासून प्रतिसाद देणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पहात असतांना त्यांनी एका घंट्यात एकदाही घड्याळाकडे पाहिले नाही. त्यांनी संपूर्ण कार्य एकाग्रतेने समजून घेतले. कार्य समजून घेतांना काही वेळा त्यांनी काही गोष्टींना ‘वाह !’, असे म्हणून मनापासून प्रतिसादही दिला.
५ ऊ. श्री. महेशजींचे लक्षात आलेले वेगळेपण ! : सर्वसामान्यतः कलाकारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते, त्या वेळी मुलाखत पूर्ण होण्याकडेच त्यांचा अधिक कल असतो; परंतु महेशजींनी हे संशोधन कार्य समजून घेतांना त्यांच्या घेण्यात येणार्या मुलाखतीविषयी एकदाही विचारले नाही. यावरून आम्हाला त्यांचे वेगळेपण जाणवले.
६. श्री. महेशजी यांचे कुटुंबीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या साधनामार्गानुसार साधनारत असून ‘महाराजांच्या इच्छेनेच श्री. महेशजी रामनाथी आश्रमात आले’, असे वाटणे
श्री. महेशजींचे काही लेख आणि ध्वनी-चित्रचकत्या माझ्या पहाण्यात आल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘ते लहानपणापासून गोंदवले (जिल्हा सातारा) येथे नियमित जातात. त्यांचे वडील तेथील अन्नछत्राचे मुख्य सेवेकरी होते. त्यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे असून त्यांना साधनेचे पाठबळ आहे.’
त्या वेळी मला उलगडा झाला, ‘गुरुतत्त्व एकच असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज देहामध्ये नाहीत; परंतु त्यांच्याप्रमाणेच ईश्वरी कार्य करणारे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पवित्र आश्रमात येण्यासाठी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनीच श्री. महेशजींना प्रेरणा दिल्यामुळे ते सहजतेने आश्रमात आले.’
‘श्री. महेश काळे यांची व्यस्तता अधिक असतांनाही आपला वेळ देऊन ते आश्रमात आले, तसेच त्यांनी आवर्जून सगळे कार्य समजून घेतले’, यासाठी महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत.’
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.१२.२०२१)
‘श्री. महेशजी यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराला ‘रामनाथी आश्रमाला भेट द्यावी’, असे वाटणे’, हे दैवी नियोजन होते’, असे जाणवणे‘केवळ एका लघुसंदेशावर एवढ्या मोठ्या कलाकाराने आश्रमात येणे’, हा केवळ दैवी योगच होता; अन्यथा ‘आमची काही ओळख नसतांना आणि त्यांना सनातनचे तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य ठाऊक नसतांना ‘त्यांना आश्रमाला भेट देण्याची इच्छा होणे’, हे ईश्वरी नियोजनच होते’, असे मला जाणवले. यातून शिकायला मिळाले की, अनेकदा आपल्याला वाटते, ‘आम्ही बोलावले; म्हणून ते आले’; पण असे नसते; कारण ती गोष्ट घडण्याचा काळही आला असल्याने ती गोष्ट सहजतेने होते. – सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर |
श्री. महेश काळे यांचा कृतज्ञताभाव !
१. ‘संगीतातील संशोधन कार्य पहायला मिळणे’, ही मोठी भेटच आहे’, असे श्री. महेशजी यांनी सांगणे
‘संशोधन कार्य पाहून झाल्यावर श्री. महेशजी आश्रमातून निघणार होते. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो, ‘आम्हाला आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे. त्यासाठी थोडे थांबावे.’’ त्या वेळी ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘एवढे संशोधन कार्य दाखवून आपण मला भेटच दिली आहे. आता वेगळी भेट कशाला ?’’
२. श्री. महेशजींना श्रीरामाचे चित्र भेट दिल्यावर त्यांनी त्यावर डोके टेकवून नमस्कार करणे
कार्यक्रमाच्या शेवटी सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६२ वर्षे) यांच्या हस्ते श्री. महेश काळे यांना सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र भेट देण्यात आले. ते हातात घेतल्यावर त्यांनी त्या चित्रावर डोके टेकवून नमस्कार केला. या वेळी श्री. महेशजी यांच्या समवेत त्यांचे बंधू श्री. मंदार काळे यांनाही प्रसाद देण्यात आला.’
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.१२.२०२१)