आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र
सनातन संस्थेच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांच्या संदर्भात ज्ञान मिळते. हे ज्ञान काही वेळा कळण्यास कठीण असते, तर काही वेळा त्यात असणार्या त्रासदायक शक्तीमुळे ते अनेक वर्षे वाचणे शक्य होत नाही. असे काही तरी असते, हे वाचकांना कळावे, यासाठी नूतन लेखमालिका चालू करत आहोत.
(लेख १)
१. आध्यात्मिक पातळी घोषित करण्याचे महत्त्व
१ अ. आध्यात्मिक पातळी घोषित न केल्यास जिवामध्ये अप्रकट स्वरूपात शक्ती कार्यरत रहाणे
‘सर्वसाधारणतः विशिष्ट आध्यात्मिक पातळी गाठल्यावर जिवाचे विशिष्ट पंचतत्त्वांशी निगडित शक्तीचे ग्रहण होणे चालू होते, उदा. आपतत्त्वप्रधान शक्ती, तेजोमय शक्ती इत्यादी. या शक्ती ग्रहण करण्यास जिवाचा सूक्ष्मदेह संवेदनशील झालेला नसल्याने पंचतत्त्वांशी निगडित शक्ती अप्रकट शक्तीच्या स्वरूपात त्याच्यात कार्यरत रहाते. यामुळे आध्यात्मिक पातळी असतांनाही जिवाला मर्यादित स्तरापर्यंत शक्तीचा वापर करता येतो. शक्ती प्रकट झालेली नसल्याने जिवाला त्याचा वापर करून पुढच्या टप्प्याची साधना किंवा सूक्ष्मातील कार्य करता येत नाही. यामुळे जिवाच्या साधनेत अडथळा येऊन पुढची आध्यात्मिक प्रगती होण्यास दीर्घकाळ लागतो.
१ आ. आध्यात्मिक पातळी घोषित केल्याने आकाशतत्त्वामुळे शक्तीची जागृती होणे
‘जिवाची आध्यात्मिक पातळी घोषित करणे’, ही आकाशतत्त्वाशी निगडित प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे आकाशतत्त्व, म्हणजे निर्गुणाच्या जवळचे तत्त्व कार्यरत होते. आकाशतत्त्वाच्या ‘सर्वसमावेशकता’ या गुणधर्माच्या परिणामांमुळे जिवाचा देह समर्थ होऊन त्याच्यात अप्रकट स्वरूपात असणारी पंचतत्त्वप्रधान शक्ती जागृत होऊन प्रकट होते, तर ‘सर्वव्यापकता’ या गुणधर्मामुळे पंचतत्त्वप्रधान प्रकटशक्तीच्या विविध घटकांवर (स्थूलदेह, प्राणशक्ती, मन, बुद्धी आणि अहं यांवर) आणि सूक्ष्मातील कार्यावर परिणाम होतो. यामुळे जिवाच्या साधनेला गती मिळून त्याची व्यष्टी आणि समष्टी साधना होऊन शीघ्र आध्यात्मिक प्रगती होण्यास साहाय्य होते.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या कार्यपद्धतीचे लाभ
‘आध्यात्मिक पातळी घोषित करणे’, ही आकाशतत्त्वाशी निगडित प्रक्रिया आहे. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर आकाशतत्त्वातील निर्गुणतत्त्वामुळे जिवाच्या मनात जडत्वाला सोडून सूक्ष्मतेकडे जाण्याची जाणीव निर्माण होऊन त्यानुसार कृती होणे चालू होते. या प्रक्रियेतही आकाशतत्त्वातील निर्गुणतत्त्व साहाय्य करत असल्याने जिवाला अनेक वर्षांची सवय, संस्कार, पद्धती, सेवा अशा विविध जडत्वांना सोडणे शक्य होते. यामुळे साधनेत जीव विशिष्ट टप्प्याला अडकून रहात नाही.
याउलट अन्य पंथांत किंवा योगमार्गांमध्ये तसे अल्प प्रमाणात करत असल्याने अधिकांश साधक जीवनभर एकाच टप्प्याला अडकून रहातात आणि त्यातून बाहेर पडून पुढच्या टप्प्याची साधना करण्यासाठी त्यांना पुढचा जन्म घ्यावा लागतो. यामुळे कोट्यवधी जन्मांनंतर जिवाला ईश्वरप्राप्ती होते. यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याची कार्यपद्धती निर्माण करण्याचे महत्त्व लक्षात येते.
२. विशिष्ट आध्यात्मिक पातळी आणि व्यष्टी अन् समष्टी साधनेनुसार तिच्याशी निगडित पंचतत्त्व आणि त्याचे शास्त्र
२ अ. विशिष्ट आध्यात्मिक पातळी आणि व्यष्टी अन् समष्टी साधनेनुसार तिच्याशी निगडित पंचतत्त्व
२ आ. समष्टी साधना केल्यावर विशिष्ट आध्यात्मिक पातळीला उच्च स्तराच्या पंचतत्त्वांची शक्ती कार्यरत होण्यामागील कारण
२ आ १. पिंडात क्षमतेनुसार ईश्वरी शक्ती आकृष्ट होणे : जिवाच्या पिंडातील क्षमतेनुसार, म्हणजे त्याला सहन होऊ शकेल एवढ्या स्तराची ईश्वरी शक्ती आकृष्ट होते.
२ आ २. व्यष्टी साधना करणार्या जिवाच्या शुद्धीसाठी शक्ती कार्यरत झाल्याने शक्ती ग्रहण किंवा प्रक्षेपित करण्याची पिंडाची क्षमता मंदावणे : व्यष्टी साधना करतांना स्वभावदोष, अहं आणि देहभाव तुलनेत अधिक प्रमाणात टिकून रहातात. यामुळे जिवाच्या पिंडात ईश्वरी शक्ती आकृष्ट झाल्यावर पिंडशुद्धीसाठी तिचे घनीकरण होते. पिंडशुद्धीसाठी शक्तीचे घनीकरण होऊन ईश्वरी शक्तीतील प्रकटतेत वाढ होऊन ती अधिक प्रमाणात व्यय होते. पिंडशुद्धीची प्रक्रिया करण्यासाठी शक्ती दीर्घकाळ पिंडात कार्यरत रहात असल्याने शक्ती ग्रहण किंवा प्रक्षेपित करण्याची जिवाच्या पिंडाची क्षमता मंदावते.
२ आ ३. समष्टी साधनेमुळे स्वभावदोष आणि अहं अल्प झालेले असल्याने पिंडाची शक्ती ग्रहण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असणे : समष्टी साधना करतांना स्वभावदोष, अहं आणि देहभाव न्यून होतात. यामुळे जिवाच्या पिंडात ईश्वरी शक्ती घनीभूत न होता ती निर्गुणातून सगुणात रूपांतरित होऊन समष्टीसाठी प्रक्षेपित होते. या प्रक्रियेत पिंडात कार्यानुसार आणि काळानुसार शक्तीचे आकर्षण आणि प्रक्षेपण होत असल्याने जिवाच्या पिंडातील क्षमता टप्प्याटप्प्याने वाढत असते. यामुळे एकसारखी आध्यात्मिक पातळी असतांनाही व्यष्टी साधना करणार्या जिवाच्या पिंडात तुलनेत पंचतत्त्वांतील पृथ्वी आणि आप या कनिष्ठ पंचतत्त्वांशी; पण जीव सहन करू शकेल एवढी, तर समष्टी साधना करणार्या जिवाला त्याच्याहून तेज, वायू आणि आकाश या उच्च स्तराच्या पंचतत्त्वांशी निगडित शक्ती ग्रहण होते.
३. ५०, ६०, ७०, ८० आणि ९० अशा विविध आध्यात्मिक स्तरांची पातळी घोषित केल्यावर संबंधित साधक अन् संत यांच्यावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम
व्यष्टी किंवा समष्टी साधना करणार्या जिवाची विशिष्ट आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर त्याच्याशी निगडित पंचतत्त्वांची शक्ती कार्यरत होते. या शक्तीच्या गुणधर्मानुसार जिवावर चांगले आणि वाईट परिणाम होतात.
३ अ. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर स्तरानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे साधक अन् संत यांच्या सूक्ष्मदेहांवर (टीप) होणारे परिणाम
टीप : स्थूलदेह म्हणजे शरीर आणि प्राणदेह (प्राणवहनसंस्था), तर सूक्ष्मदेह म्हणजे मनोदेह (मन), वासनादेह (चित्त), कारणदेह (बुद्धी) आणि महाकारणदेह (अहं)
३ अ १. पातळीनुसार व्यष्टी साधना करणारे साधक आणि संत यांचा स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांवर होणारे चांगले आणि वाईट परिणाम
३ अ २. समष्टी साधना करणारे साधक आणि संत यांच्या सूक्ष्मदेहांवर (टीप) होणारे चांगले आणि वाईट परिणाम
टीप १ : ९० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीला समष्टी साधना करणार्या जिवाचे बुद्धी, चित्त आणि अहं समष्टीशी एकरूप होतात. यामुळे त्यांच्यावर काहीच वाईट परिणाम होत नाही. यामुळे ९० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांचे स्थूलदेह आणि प्राणदेह यांवर वाईट शक्ती आक्रमण करतात.
३ आ. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर स्तरानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे साधक अन् संत यांवर होणारी ईश्वरी कृपा आणि पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण
टीप : समष्टी साधना करणार्या जिवांच्या साधनेचे परिणाम समष्टीवर होत असल्याने त्यांच्यावर होणार्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणांच्या प्रमाणामध्येही वाढ होते. समष्टी साधना करणारे पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणांना न भिता समष्टी साधना करत असल्याने त्यांच्यावर त्या तुलनेत ईश्वरी कृपाही अधिक होते.
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०१८, रात्री ७.०४)
३ इ. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर स्तरानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्या जिवांवर होणारे अन्य परिणाम
४. ५०, ६० आणि ७० अशा विविध स्तरांची पातळी घोषित झाल्यावर संबंधित बालसाधक आणि बालसंत यांच्यावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम
४ अ. आध्यात्मिक पातळी आकाशतत्त्वाशी निगडित असल्याने ती घोषित केल्यावर तिचे परिणाम बालसाधक आणि बालसंत यांच्या वयानुसार पुष्कळ न पालटणे
आध्यात्मिक पातळी घोषित करण्याची प्रक्रिया आकाशतत्त्वाशी, म्हणजे स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे असलेल्या निर्गुणाशी निगडित आहे. यामुळे आध्यात्मिक पातळी घोषित करण्याचा जिवावर होणारा परिणाम स्थळ, काळ आणि वय यांनुसार वेगवेगळा नसतो. याच कारणामुळे मृत्यूनंतर उच्च लोकांमध्ये साधना करणार्या साधक आणि संत यांची आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावरही तेवढाच परिणाम होतो. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर होणारे परिणाम सूक्ष्मदेहांवर अधिक प्रमाणात होत असल्याने साधक, बालसाधक, संत आणि बालसंत यांच्या संदर्भात सूक्ष्म स्तरावर होणारे चांगले अन् वाईट परिणाम ९० टक्के एकसारखेच असतात. केवळ व्यष्टी आणि समष्टी साधना यांमुळे त्यांच्यात अंतर असते. साधक आणि संत यांच्या तुलनेत बालसाधक अन् बालसंत यांचे स्थूलदेह आणि प्राणदेह यांची क्षमता १० टक्के अल्प असल्याने त्यांच्यात पुढील वेगळे परिणाम दिसून येतात
४ आ. बालसाधक आणि बालसंत यांची पातळी घोषित केल्यावर त्यांच्या प्राणदेहावर होणारे परिणाम
बालसाधकांची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर ईश्वर त्यांच्याभोवती संरक्षककवच सिद्ध करतो. यामुळे आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावरही पाताळातील मोठ्या वाईट शक्तींना त्यांना त्रास देता येत नाही आणि त्यांना सहजतेने समष्टी साधना शिकून करता येते. याउलट बालसंतांच्याभोवती जन्मापासून संरक्षककवच असते. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांचे समष्टीशी निगडित कार्य व्यापक स्तरावर आणि काळानुसार आरंभ होते.
५. पातळी घोषित केल्यानंतर साधक, बालसाधक, संत आणि बालसंत यांच्या आध्यात्मिक पातळीत घसरण होण्यामागील कारण
आध्यात्मिक पातळी जिवाच्या सूक्ष्म स्थितीशी निगडित असते. कोणत्याही वयातील किंवा स्थूलदेह आणि प्राणदेह नसलेल्या लिंगदेह स्वरूपात असणार्या जिवामधील स्वभावदोष आणि अहं उफाळून येऊन तो मायेत अडकल्यावर त्याची सूक्ष्म स्थिती सकारात्मकहून नकारात्मक होते. यामुळे त्याची आध्यात्मिक अधोगती होते. ही प्रक्रिया वय, परिस्थिती आणि काळ सापेक्ष नसते. यातून सर्वच जिवांना स्वभावदोष-आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवण्याचे महत्त्व लक्षात येते. बालसाधक आणि बालसंत यांच्या पालकांनी बालकांना ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया’ यांचे शिक्षण देणे पालकांची साधना आहे.
६. निष्कर्ष
आध्यात्मिक पातळी घोषित केल्याने व्यष्टी (जीव) आणि समष्टी (सप्तलोक आणि सप्तपाताळ) दोन्हींवर परिणाम होते. यामुळे व्यक्तीच्या सर्वांगीण प्रगतीसमवेत समष्टीचीही प्रगती झाल्याने धर्मव्यवस्था निर्माण होण्यास साहाय्य होते. यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ईश्वरेच्छेने निर्माण केलेल्या आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या प्रक्रियेचे असाधारण महत्त्व लक्षात येते.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१८, संध्याकाळी ६.५८)
ज्ञानाची प्रक्रिया
७. पातळी घोषित होण्याच्या संदर्भातील धारिकेचे टंकलेखन आणि संकलन करतांना आलेली अनुभूती अन् झालेले त्रास
७ अ. ज्ञानाचे टंकलेखन आणि संकलन करतांना निर्विचार स्थितीत राहून गतीने टंकलेखन होऊन स्वतः मोठे होत असण्याची अनुभूती येणे
‘सर्वसाधारपणे ज्ञानाचे टंकलेखन करतांना ते कळण्यास सोपे व्हावे, या दृष्टीने मी मन आणि बुद्धी यांनी पहिले वाक्यरचना बनवून मग त्याचे टंकलेखन करतो. असे न केल्यास अनावश्यक ज्ञान किंवा क्लिष्ट ज्ञानाचे टंकलेखन करण्यात वेळ वाया जातो. ‘आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र’ या ज्ञानाचे टंकलेखन आणि संकलन करतांना अधिकांश वेळा माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती. यामुळे मन आणि बुद्धी यांनी वाक्यरचना करून मग त्याचे टंकलेखन करणे मला शक्य होत नव्हते. अनेक वेळा सूत्राचे टंकलेखन केल्यावर ‘ज्ञान कळण्यासारखे आहे ना ?’, असे माझ्या लक्षात आल्यावर मी ती सूत्रे पडताळली. ज्ञान पडताळल्यावर ‘ज्ञानातील वाक्यांची रचना कळण्यासारखी आणि सहज असून त्यातून चांगली स्पंदने येतात’, असे माझ्या लक्षात आले. याचे मला आश्यर्च वाटले. ज्ञानाचे टंकलेखन आणि संकलन करतांना अनेकदा ‘मी मोठा होत जाऊन संगणकाचा पडदा (स्क्रीन) लहान होत आहे’, असे जाणवायचे. ‘ज्ञान आकाशतत्त्वाशी निगडित असल्याने असे होत असावे’, असे मला जाणवले.
७ आ. ज्ञानाचे टंकलेखन करतांना शारीरिक त्रासांमध्ये वाढ होऊन सेवेसाठी बसणे कठीण होणे आणि प्रयत्नपूर्वक बसल्यावर ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातून आध्यात्मिक स्तरावरील लाभ होऊन त्रास अल्प होणे
‘आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र’ या ज्ञानाचे टंकलेखन आणि संकलन करतांना माझ्या शारीरिक त्रासांमध्ये पुष्कळ वाढ झाली होती. १७.१२.२०१८ या दिवशी ज्ञानाचे टंकलेखन करून रात्री झोपल्यावर मला अर्धवट झोप लागली. ‘सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे जाणवून अधून-मधून मला जाग यायची आणि काही काळ नामजप अन् आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर परत झोप लागायची. रात्री अर्धवट झोप लागल्याने मला दुसर्या दिवशी अपचनामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांचा त्रास होऊन पोट अन् गुदद्वार यांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. अपचनामुळे जीभेवर दिवसभर कडवट चव येऊन मळमळत होते आणि थकवा येऊन झोपावेसे वाटत होते. यामुळे सकाळी मला जेमतेम दोन-अडीच घंटे सेवेसाठी बसता आले. दुपारी १ घंटा विश्रांती घेऊनही आणि दोन घंटे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनही फारसे परिणाम जाणवत नव्हते. शेवटी संध्याकाळी ५.३० पासून हट्टपूर्वक टंकलेखन आणि संकलनाच्या सेवेला बसल्यावर हळूहळू त्रासाचे प्रमाण उणावले. यातून ‘ज्ञानप्राप्तीची सेवा हेच आध्यात्मिक स्तरावरील उपाय’, याची परत एकदा अनुभूती आली.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१८, सायंकाळी ७.१५)
श्री. निषाद देशमुख यांना मिळालेले ज्ञान (टीप) परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पडताळण्यापूर्वी आणि पडताळल्यानंतर श्री. निषाद देशमुख अन् कु. मधुरा भोसले यांना त्यासंदर्भात आलेल्या अनुभूती !टीप – ज्ञानाचा मथळा – ‘आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र’ १ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र’ याविषयीचे ज्ञान पडताळण्यापूर्वी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना आलेल्या अनुभूती १ अ १. श्री. निषाद देशमुख – २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत मी प्रतिदिन ही धारिका वाचण्याचे प्रयत्न केले; पण या धारिकेतील ज्ञान मला कळले नाही आणि नवीन ज्ञानही मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न कु. मधुरा भोसले आणि श्री. राम होनप यांना देऊ शकतो का ? (५.११.२०२०) १ अ २. कु. मधुरा भोसले – धारिका उघडल्यावर माझे डोके जड झाले आणि मला काहीही सुचत नसल्यामुळे मी ही धारिका परत करत आहे. (७.११.२०२०) १ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र’ याविषयीचे ज्ञान पडताळल्यानंतर ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना आलेल्या अनुभूती १ आ १. श्री. निषाद देशमुख – धारिका उघडताच सप्तकुंडलिनी चक्रांवर शीतलता जाणवणे आणि ज्ञान वाचतांना आनंद होणे : ‘धारिका उघडल्यावर मला माझ्या सर्व कुंडलिनीचक्रांवर शीतलता जाणवली. ‘धारिकेतून जणू थंड पाण्याचे तुषार प्रक्षेपित होत आहेत आणि ते माझ्या सहस्रारचक्र ते मूलाधाराचक्रापर्यंत सर्व चक्रांवर परिणाम करत आहेत’, असे मला जाणवले. धारिकेतील ज्ञान वाचल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.’ – (२५.११.२०२१, सायं ६.०५) १ आ २. कु. मधुरा भोसले – ‘ही धारिका वाचत असतांना आनंद जाणवला आणि ज्ञानाचे आकलनही झाले. आधीच्या तुलनेत या धारिकेतील त्रासदायक शक्ती पुष्कळ प्रमाणात न्यून झाल्याचे जाणवले.’ (२४.११.२०२१) |
(लेख २) ‘गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे होणारी चित्तशुद्धी’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/541137.html
|