पोलिसांच्या साहाय्यानेच गुंडांनी रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याची माहिती उघड : पोलीस निरीक्षक निलंबित
कळंगुट येथील रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याचे प्रकरण
गुंडांना तोडफोडीसाठी साहाय्य करणारे कायदाद्रोही पोलीस अधिकारी !
पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) – कळंगुट येथील प्रसिद्ध ‘सोझा लोबो’ रेस्टॉरंटमधील ‘पब’वर २८ डिसेंबर या दिवशी प्रतिस्पर्धी व्यावसायिक आणि इतर ८० जण यांनी लोखंडी सळ्या, काचेच्या बाटल्या आणि चाकू यांनी आक्रमण केले होते. हे आक्रमण पूर्वनियोजित आणि पोलिसांना हाताशी धरूनच झाल्याची माहिती उघड झाली आहे. पोलीस अधीक्षक सुबीत सक्सेना (आय.पी.एस्.) सुटीवर गेल्याचे पाहून कळंगुटमध्ये ‘डान्स बार’ चालवणार्या एका एजंटने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकार्याला हाताशी धरून हे कृत्य केल्याचे, तसेच या आक्रमणात कळंगुट पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या वेळी ‘नाईट क्लब’चा मालक गजेंद्र उपाख्य छोटू याने त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने रेस्टॉरंटमध्ये घुसून पोलिसांच्या समक्ष कर्मचारीवर्गाला मारहाण केली होती.
सध्या हे प्रकरण अन्वेषणासाठी कळंगुट पोलिसांकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपुर्द करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने अन्वेषणाची सूत्रे हाती घेतल्यावर त्वरित आक्रमण प्रकरणात प्रमुख सहभाग असलेल्या पोलीस हवालदाराला अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत ‘सर्व काही’ पोचवण्याचे काम हा पोलीस हवालदार करत होता. ‘नाईट क्लब’चा मालक गजेंद्र उपाख्य छोटू याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याशी सोटेलोटे असल्याची माहिती मिळाली आहे. या पोलीस अधिकार्याला हाताशी धरूनच पोलीस अधीक्षक सुबीत सक्सेना (आय.पी.एस्.) यांच्या अनुपस्थितीत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Crime branch to probe Calangute attack case, PI Raposo suspended https://t.co/tEdaZpbIpz
— TOI Goa (@TOIGoaNews) December 30, 2021
‘सोझा लोबो’ रेस्टॉरंटवर चालू वर्षी तिसर्यांदा आक्रमण झाले आहे. रेस्टॉरंटवर यापूर्वी नोव्हेंबर २०२० आणि मार्च २०२१ मध्ये आक्रमण झाले आहे; मात्र नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या आक्रमणाविषयी पोलिसांनी अजूनही आरोपपत्र प्रविष्ट केलेले नाही.
पोलीस निरीक्षक निलंबित
हे प्रकरण अयोग्यरित्या हाताळल्याचा, तसेच सेवेत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून कळंगुट पोलीस ठाण्याचे निरीक्षक नालास्को रापोझ यांना शासनाने सेवेतून निलंबित केले आहे, तर लक्षी आमोणकर यांची कळंगुट पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रेस्टॉरंटवरील आक्रमणावरून कळंगुट पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही, तर याविषयी लोकांकडून रोष व्यक्त झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरच कळंगुट पोलिसांनी दोषींना कह्यात घेतले आहे. (अशा पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. त्यांना सेवेतून काढून टाकून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला पाहिजे, तरच अन्य कुणी असे करू धजावणार नाही ! – संपादक) पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ‘नाईट क्लब’चा मालक गजेंद्र उपाख्य छोटू याच्यासह एकूण ९ संशयितांना कह्यात घेतले आहे. या घटनेनंतर २ दिवसांनी मुख्य संशयित सुनील भोमकर यांनी ३१ डिसेंबर या दिवशी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला आहे.