पुण्यातील ‘महामेट्रो’चा राडारोडा मुठा नदीपात्रात टाकला जात आहे !
पुणे – ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून (महामेट्रो) स्वारगेट येथील मेट्रोच्या बांधकामातील माती, गाळ तसेच राडारोडा डंपरच्या साहाय्याने राजाराम पूल ते म्हात्रे पूल या पट्ट्यात कै. राजा मंत्री पथालगत (डीपी रस्ता) मुठा नदीकडेला असलेल्या हरित पट्ट्यात मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे, अशी तक्रार पर्यावरण कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि महापालिका यांकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या राडारोडा टाकण्याचे काम थांबवण्यात आले आहे.
यादवाडकर यांनी सांगितले की, नदीपात्रांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे गेल्या २-३ वर्षांपासून नदीची वहनक्षमता अल्प होत आहे. अलीकडच्या काळात पुराच्या पातळीत वाढ झालेली आहे. नदीपात्रामध्ये टाकण्यात येणारा राडारोडा हा अतिशय गंभीर प्रकार आहे.