तत्त्वनिष्ठ आणि ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ या भावाने सेवा करणार्या रामनाथी आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल !
‘संतांच्या खोलीची स्वच्छता करणार्या साधिका सौ. वर्धिनी गोरल यांचे संत अनेक वेळा कौतुक करतात. ते मला ‘तिच्याकडून शिकून घे’, असे सांगतात. वर्धिनीताई समवेत सेवा करतांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. नियोजनबद्ध सेवा करणे
ताई प्रत्येक कृती वेळेत करते. ‘कुठल्या सेवेला किती वेळ लागणार ?’, याचा अभ्यास करून ती तसे नियोजन करते आणि सेवा वेळेत पूर्ण करते. ती कधी कंटाळा करत ना ही. काही वेळा अकस्मात् एखादी सेवा आल्यास ताई सेवेचे परिपूर्ण नियोजन करते. याबद्दल संतांनी तिचे कौतुक केले आहे. सेवा करतांना एखादी चूक झाल्यास तशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी ती सतर्क असते.
२. संतांनी वर्धिनीताईच्या समष्टी गुणाचे केलेले कौतुक !
ताई मनात कुठलीच गोष्ट ठेवत नाही. तिला साधकांच्या चुका लक्षात आल्यास ती त्या त्या वेळी संबंधितांना सांगते. एकदा संत मला म्हणाले, ‘‘वर्धिनी मनमोकळी आहे. ती सर्वांना समजून घेऊन तत्त्वनिष्ठतेने चुका सांगते. हाच तिचा समष्टी गुण आहे.’’
३. परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणे
३ अ. ‘संतांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये’, असा विचार करून सेवा करणे : ताईने मला संतांच्या खोलीतील स्वच्छतेचे सर्व बारकावे समजावून सांगितले. ‘अशा पद्धतीने सेवा करण्यामागे काय उद्देश आहे ? आणि ‘असे केले नाही, तर काय परिणाम होऊ शकतो ?’, हेही तिने मला सांगितले. त्यामुळे माझ्यातही सतर्कता निर्माण होऊ लागली. ‘स्वतः करत असलेल्या सेवेतून संतांना कुठल्याच प्रकारची अडचण येऊ नये’, असा विचार करत ती सेवा करते. त्यामुळे ती सतत गुरूंच्या अनुसंधानात असते.
३ आ. ‘संतांच्या खोलीच्या सेवेत कोणतीच चूक व्हायला नको’, ही तळमळ असल्याने साधिकेला वेळोवेळी चुका सांगणे : एकदा माझ्याकडून सेवेत एक चूक झाली; पण ‘ही चूक आहे’, असे मला वाटले नाही. तेव्हा वर्धिनीताई मला म्हणाली, ‘‘तुला काहीही वाटू दे. सेवेत तुझी चूक झाल्यास मी तुला सांगत रहाणार. संतांच्या खोलीच्या सेवेत चुका व्हायला नकोत.’’ यावरून माझ्या लक्षात आले, ‘समोरच्या व्यक्तीला स्वतःबद्दल प्रतिक्रिया येईल’, या विचारापेक्षा ‘संतांची सेवा परिपूर्ण व्हायला हवी’, हे तिच्यासाठी अधिक मोठे आहे.
३ ई. संतांनी केलेल्या कौतुकात न अडकता आणखी चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करणे : संत अनेक वेळा वर्धिनीताईचे कौतुक करतात. मी तिला याविषयी सांगितल्यावर ती म्हणते, ‘‘तेच सर्व करवून घेतात आणि कौतुक मात्र माझे करतात. ते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, उत्साही ठेवण्यासाठी आपले कौतुक करतात. आपण त्यात न अडकता ‘सेवा करतांना कुठे न्यून पडतो’, हे पाहून त्यावर प्रयत्न करायला पाहिजेत.’’
परात्पर गुरुदेव, तुमच्या कृपेमुळेच मला सौ. वर्धिनीताईसारखी सहसाधिका मिळाली. तुम्ही मला तिच्यातील गुण दाखवलेत, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता ! ‘तिच्याप्रमाणे मलाही तुमचे मन जिंकता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’
– कु. करुणा मुळे (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२१)