भारताला ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता नाही ! – कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था
‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ परिसंवादात ‘पोकळ स्त्रीवाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !
जयपूर (राजस्थान) – विदेशी अनुदानित संस्था ‘स्त्रीयांना बरोबरीचा दर्जा द्यायला हवा’, हे विचार भारतियांवर थोपवत आहेत. खरे पहाता, स्त्रीला मनुष्यनिर्मितीचे यंत्र आणि ‘व्हीच’ (चेटकीण) म्हणणार्यांना ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता आहे. ‘स्त्रीवादा’चे भूत भारतीय महिलांच्या मनात भरवले जात आहे. भारतीय स्त्रियांनी त्यापासून सतर्क रहायला हवे. पुरुषांच्या बरोबरीने बसणे, सौंदर्यवर्धनालयात (‘पार्लर’मध्ये) जाणे म्हणजे महिला सशक्तीकरण नाही. युद्धावर गेलेल्या पतीला स्वतःचे मस्तक पाठवून युद्ध करण्याची प्रेरणा देणार्या राणी हाडीचा आदर्श भारताला लाभला आहे. राज्यकारभार सांभाळणार्या अनेक स्त्रिया हिंदु संस्कृतीत होऊन गेल्या. त्यामुळे स्त्रीवादाची भारताला आवश्यकताच नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी केले. ‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स २०२१’ या परिसंवादामध्ये २३ डिसेंबर २०२१ या दिवशी झालेल्या ‘पोकळ स्त्रीवाद’ या विषयावर त्या बोलत होत्या.
जयपूर येथील श्री. निधीश गोयल यांच्या ‘जम्बू टॉक्स’ या यू ट्यूब वाहिनीवर २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत ५ दिवसांच्या ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘मानुषी’ संघटनेच्या सहसंस्थापिका आणि लेखिका प्रा. मधु पूर्णिमा किश्वर यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. रचना सक्सेना यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
हिंदु समाज विकृत असता, तर अहिल्याबाई होळकर यांना देवीचा दर्जा दिला नसता ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्वर, ‘मानुषी’ संघटनेच्या सहसंस्थापिका आणि लेखिका
हिंदु संस्कृती स्त्रीला देवीचे स्थान देते. स्त्रीची कुणाशीही तुलना करता येत नाही. स्त्रीवाद ही आयात झालेली साम्राज्यवादी विचारसरणी असल्याने त्यापासून जेवढे दूर राहू, तेवढे चांगले ! भारतीय हिंदु समाजाने स्त्रियांवर अत्याचार केले असते, भारतीय हिंदु समाज विकृत असता, तर त्यांनी अहिल्याबाई होळकर यांना देवीचा दर्जा दिला नसता. भारतीय सुशिक्षित समाज हिंदु संस्कृतीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे तो अपराधाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. त्यामुळे त्यांची अशी विचारसरणी झाली आहे. ब्रिटिशांनी हिंदूंचा मानसिक, बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या बुद्धीभेद केला आहे. त्यामुळे पाश्चात्त्य जे म्हणतील, तेच योग्य मानले जाते. हिंदु परंपरांच्या अनुषंगाने लागू झालेल्या आणि भविष्यात लागू होणार्या कायद्यांचा अभ्यास अन् परिणामांचा विचार करावा.
सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांचे युवकांना आवाहन
योग्य-अयोग्य याचा अभ्यास करून स्वतःचे मत बनवा !तुम्ही (युवकांनी) दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहून स्वतःचे मत ठरवत असाल, तर तसे करू नका. तुम्ही सुशिक्षित आहात, तर योग्य-अयोग्य याचा अभ्यास करून स्वतःचे मत बनवा. |