पोळ्या करतांना परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण येऊन त्यांना प्रार्थना केल्यावर पोळीवर मोराची आकृती उमटलेली दिसणे
१. भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात सतत साधकांचेच विचार असतात’, असे सांगणे आणि गुरुदेवांच्या आठवणीने भावजागृती होणे : ‘गुरुवार ७.४.२०२० या दिवशीच्या भावसत्संगामध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्यासाठी काय काय करतात ?’, याची विविध उदाहरणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितली. ‘गुरुदेवांच्या मनात केवळ साधकांचेच विचार सतत असतात’, असे त्या म्हणाल्या. तेव्हा ‘आपल्याला परात्पर गुरुदेवांची किती आठवण येते ? त्यांना आनंद देण्यासाठी आपण काय करू शकतो ?’, हा विचार माझ्या मनात येत होता. गुरुदेवांच्या आठवणीने माझा भाव जागृत होत होता.
२. ‘गुरुदेवांचे चैतन्य मिळू दे’, अशी प्रार्थना करून पोळ्या करतांना एका पोळीवर मोराची आकृती उमटलेली दिसणे आणि त्याकडे पाहून ‘विष्णुतत्त्वाची साक्ष मिळाली’, असे वाटून आनंद होणे : ८.४.२०२० या दिवशी दुपारच्या वेळी पोळ्या करत असतांना मला परात्पर गुरुदेवांची पुष्कळ आठवण आली. भावसत्संगामध्ये सांगितल्याप्रमाणे ‘त्यांच्या जन्मोत्सवाची सिद्धता रामनाथी आश्रमात चालू असून तेथे निर्माण झालेले गुरुतत्त्वाचे चैतन्य मला मिळू दे’, अशी प्रार्थना मी करत होते. त्या वेळी मी करत असलेल्या एका पोळीवर मोराची आकृती उमटली. त्या आकृतीकडे पाहून ‘मला विष्णुतत्त्वाची साक्ष मिळाली’, असे वाटून पुष्कळ आनंद झाला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. ऋतुजा नाटे, कळवा, ठाणे. (८.५.२०२०)
‘साधकाच्या भावाला भगवंत कसा निरनिराळ्या माध्यमांतून प्रतिसाद देतो’, हे ही अनुभूती वाचून लक्षात येते ! ‘साधनेमुळे होणार्या या परिणामांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होईल’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले अशा बुद्धीअगम्य घटनांचा अभ्यास करत आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना, वस्तू, वास्तू किंवा वातावरण यांतील असे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे. |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक