डोंबिवली, ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट !
डोंबिवली, ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी आणि त्यांच्या पत्नी सौ. स्नेहल सोवनी हे २९ आणि ३० डिसेंबर २०२१ असे २ दिवस सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास होते. श्री. योगेश सोवनी यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)) यांनी आश्रम दाखवला. या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. योगेश सोवनी यांच्या तबलावादनाचे पेशकार, कायदा, रेला, बंदिशी (टीप) इत्यादी प्रकारांचे विविध संशोधनाचे प्रयोग घेण्यात आले.
टीप : पेशकार – तबलावादकाच्या प्रतिभेला चालना देणारा, सर्व प्रकारच्या लयकारीला मुभा देणारा आणि वादनाच्या आरंभी वाजवला जाणारा प्रकार आहे. कायदा – स्वतंत्र तबलावादनातील एक विस्तारक्षम रचना रेला – स्वतंत्र तबलावादनात द्रूतलयीत वाजवला जाणारा प्रकार बंदिश – तबलावादनाशी संबंधित बोलांची रचना |
श्री. योगेश सोवनी यांचा परिचयश्री. योगेश सोवनी हे उत्तम व्यावसायिक तबलावादक आहेत. ते मूळचे सांगली येथील असून सध्या डोंबिवली, ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे तबल्याचे आरंभीचे शिक्षण सांगली येथील श्री. रमेश गोखले आणि श्री. निशिकांत बडोदेकर यांच्याकडे झाले. कालांतराने उस्ताद अल्लार खाँ, उस्ताद झाकीर हुसेन, पखवाज मास्टर पं. भवानी शंकर आणि पं. सुधीर माईणकर यांच्याकडे त्यांनी तबल्याचे पुढील शिक्षण घेतले. त्यांनी तबल्यामध्ये अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. श्रीमती प्रभा अत्रे, पं. सुरेश वाडकर, श्री. अनुप जलोटा, पं. जयतीर्थ मेऊंडी, सतारवादक पं. शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या प्रसिद्ध गायक-वादकांना त्यांनी तबल्यावर साथ केली असून त्यांनी एकल (सोलो) तबलावादनाचेही कार्यक्रम केले आहेत. सांगली, तसेच मुंबई आकाशवाणीवर त्यांचे एकल तबलावादनाचे कार्यक्रम झाले आहेत. गांधर्व महाविद्यालय, सुरेश वाडकर्स आजीवसन म्युझिक ॲकॅडमी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अशा शास्त्रीय संगीताचा प्रसार करणार्या वेगवेगळ्या संस्थांमधील कामाचा त्यांना अनुभव आहे. |
श्री. योगेश सोवनी यांनी संगीताविषयी सांगितलेले मौलिक सूत्र
‘गुरु हे महान असतात. त्यामुळे गुरूंचे अनुकरण करण्यापेक्षा गुरूंनी दिलेल्या विद्येशी प्रामाणिक राहून प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. बाह्यतः गुरूंचे वागणे, बोलणे, पेहराव, केशरचना इत्यादींचे अनुकरण करण्यापेक्षा ‘ते या स्तरापर्यंत कसे आले ?’ ते शिकण्याचा ध्यास ठेवला, तर आपण गुरूंनी दिलेली विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतो.’
– श्री. योगेश सोवनी
श्री. योगेश सोवनी यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये
१. श्री. योगेश सोवनी हे उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य आहेत. गुरुंकडून तबल्यातील विद्या ते शिष्यभावाने ग्रहण करतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरु उस्ताद झाकीर हुसेन यांच्याविषयी त्यांची श्रद्धा लक्षात आली.
२. ते सतत शिष्यभावात असल्याने त्यांच्यात अहंभाव अल्प जाणवतो. त्यांनी अनेक गुरूंकडून तबल्यातील शिकवण आध्यात्मिक स्तरावर शिकून ती ते आचरणात आणत आहेत, हे लक्षात आले.
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत विशारद (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |