‘१ जानेवारीला नववर्ष साजरे करावे का ?’, याविषयी मान्यवरांचे अभिप्राय
निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या कृती मानवासाठी पूरक, तर विरुद्ध कृती हानीकारक ! – आचार्य अशोककुमार मिश्र, चेअरमन, एशिया चॅप्टर आणि वर्ल्ड ॲस्ट्रो फेडरेशन, बिहार
ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे १ जानेवारीला केवळ हिंदूंनीच नाही, तर कुणीही नववर्ष साजरा करू नये; कारण या दिवशी नववर्ष साजरे करण्यास कोणताही वैज्ञानिक, नैसर्गिक आणि सामाजिक आधार नाही. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या कृती मानवासाठी पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या कृती हानीकारक असतात. हिंदु सनातन धर्माची ही संकल्पना नैसर्गिक आणि वैज्ञानिक आहे. त्यानुसार आचरण केल्याने लाभ होतो. वेदांचे एक अंग ज्योतिष आहे. त्या आधारे आपले पंचांग सिद्ध केले आहेत. दुर्दैवाने सनातन हिंदु धर्माची महानता, वैज्ञानिकता आणि वैशिष्ट्ये लपवण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येकाने आपापल्या धर्माला श्रेष्ठ ठरवण्यासाठी आपापले ‘कॅलेंडर’ सिद्ध केले; मात्र त्यामध्ये असंख्य त्रुटी राहिल्या; परंतु हिंदु पंचांग हे ग्रहांच्या आधारे सिद्ध केलेले, तसेच पूर्णपणे वैज्ञानिक आहे. त्यामुळे १ जानेवारीला नववर्ष साजरे करण्याला कोणताही आधार नाही.
हिंदूंचा हिंदु धर्माविषयी न्यूनगंड असल्याने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे केले जाते ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, राष्ट्र्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ
अभियंता, अधिवक्ता, आधुनिक वैद्य होण्यासाठी शिक्षण घेणारी आजची पिढी संस्कृती आणि इतिहास यांपासून दूर आहे. हिंदूंच्या मनात हिंदु धर्माविषयी न्यूनगंड असल्याने संतांच्या भूमीत ३१ डिसेंबरला मद्यपान करत मध्यरात्री नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. सर्वांनी एकत्र येऊन महान हिंदु संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याची आवश्यकता आहे.
गुलामगिरीची मानसिकता त्यागून आत्मोन्नत समाजाची निर्मिती आवश्यक ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मंदिरे उघडली जातात. हिंदु धर्मात ब्राह्ममुहूर्ताला महत्त्व आहे. ‘रात्रीच्या वेळी देवता शयन करतात’, असा हिंदु समाजाचा भाव आहे. मंदिरांचे पुजारी आणि व्यवस्थापक यांना विनंती आहे की, त्यांनी अशी प्रथा चालू करू नये. या चुकीच्या प्रथेमुळे समाजाची हानी होऊ शकते. त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून आत्मनिर्भर बनवण्यासह आत्मोन्नत समाजाची निर्मिती करणे, हे हिंदूंनी उद्दिष्ट ठेवणे आवश्यक आहे.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणार्या अपप्रकारांमध्ये निसर्गाची हानी होते. निसर्गाचा आदर केला, तर निसर्गही मनुष्याचे रक्षण करेल. ख्रिस्त्यांची विचारसरणी भोगवादाची, तर हिंदु विचारसरणी ही त्याग शिकवणारी आहे. हिंदु राष्ट्रात निसर्गाचा अपमान करणार्यांना दंड केला जाईल, तसेच हिंदु राष्ट्रात भारतीय कालगणनेचे अनुसरण केले जाईल. केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग याचे पालन निश्चितच करेल.
३१ डिसेंबर साजरा करणे, हे वर्षभराचे धर्मांतर ! – सौ. रति हेगडे, स्तंभलेखिका
३१ डिसेंबरला होणारे धर्मांतर हे एक दिवसाचे नसून वर्षभराचे असते; कारण वर्षभर ‘ग्रेगेरियन’ दिनदर्शिका वापरली जाते. स्वतःची आधुनिकता दाखवण्यासाठी हिंदू मद्यपान, मांसाहार, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी गोष्टी सर्रासपणे करतात. ३१ डिसेंबर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो; परंतु आनंदी रहाण्यासाठी अशा प्रकारचे वर्तन करण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्यायला हवे. कुटुंबासमवेत साजरा करता न येणारा दिवस उत्सव असू शकतो का ? जो उत्साह वाढवतो, तो उत्सव ! ३१ डिसेंबरच्या रात्री केलेल्या कृतींनी उत्साह वाढत नाही. कुटुंबाचे महत्त्व युवकांना समजावणे आवश्यक आहे. आपण ‘हिंदू’ म्हणून प्रतिदिनच्या कृती करत आहोत का ? याचाही विचार हिंदूंनी करायला हवा.
३१ डिसेंबरच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांची विटंबना होऊ नये, याकडे हिंदूंनी गांभीर्याने पहावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी
हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी प्रशासनाचा दुटप्पीपणा असतो. अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी आवाज, प्रदूषण आदींची प्रशासनाकडून गंभीरतेने नोंद घेतली जात नाही. केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी शासनाचा दुटप्पीपणा लक्षात येतो; कारण हिंदूसुद्धा उदासीन आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी कार्यक्रम होत असतील, तर त्याची गंभीर नोंद घेतली जावी, यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देता येईल. ऐतिहासिक स्थळांची विटंबना होऊ नये, याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. हिंदूंच्या ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी असे कार्यक्रम होणे, ही सांस्कृतिक आणि राजकीय गुलामी आहे. भारतीय वैज्ञानिक संस्कृतीविषयी पराकोटीची अनभिज्ञता असल्याने युवा पिढीला ऐतिहासिक संदर्भ सांगावे लागतील, अन्यथा भीषण परिणाम होतील.