सांगली जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर शाळा-महाविद्यालय आणि प्रशासनाकडून कृतीशील प्रतिसाद मिळणे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी अभियान
सांगली, ३० डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली. या अभियानात १७ लोकप्रतिनिधी, २९ प्रशासकीय अधिकारी, ७९ शाळा, १९ महाविद्यालये, तसेच १८ अन्यांना निवेदन देण्यात आली. जिल्ह्यातील ३० हून अधिक फलकांवर प्रबोधनपर मजकूर लिहिण्यात आला, तर १६ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. या मोहिमेत ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, वाचक, साधना सत्संगातील जिज्ञासू यांचाही चांगला सहभाग होता. ग्रामीण भागांतील शाळा, महाविद्यालये, शिक्षक यांचा पुष्कळ चांगला प्रतिसाद होता.
शाळा-महाविद्यालय
१. कौलगे (तालुका तासगाव) गावातील हायस्कूल शाळा आणि जिल्हा परिषद शाळा येथे निवेदन दिल्यावर तेथील शिक्षकांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची सूची मागितली आणि वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे ‘आम्ही १ जानेवारीला ‘हॅप्पी न्यू इअर’ म्हणणार नाही’, असे सांगितले. निवेदन देतांना धर्मप्रेमी मधुसूदन जाधव आणि मारुति पाटील उपस्थित होते. माजर्डे (तालुका तासगाव) येथील हायस्कूल शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांचे प्रबोधन करून निवेदन देण्यात आले. येथील शाळांमध्ये विषयही मांडण्यात आला.
२. ईश्वरपूर येथे जनता विद्यालयात प्रबोधन करण्यात आले. येथे ५० विद्यार्थी सहभागी होते. येथील शाळेत प्रत्येक शनिवारी १ ली ते ५ वीतील विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कारवर्ग घेण्याची मागणी आली आहे.
३. सांगली येथे सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यांना निवेदन दिल्यावर सर्व शाळांमध्ये प्रबोधन करू, तसेच फलकांवर प्रबोधनपर मजकूर लिहण्यास सांगू, असे सांगितले. ‘वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी’च्या कार्यवाह सौ. स्मिता केळकर यांना निवेदन दिल्यावर ‘असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले.
४. रामानंदनगर (तालुका पलूस) येथील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय येथील मुख्याध्यापक कदम यांनी निवेदनाच्या छायांकीत प्रती काढून प्रत्येक वर्गाच्या बाहेर लावतो असे सांगितले. रामानंदनगर येथील सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या महाविद्यालयात निवेदन दिल्यावर शाळेत येऊन माहिती सांगा, असे शिक्षकांनी सांगितले.
५. जत येथे रामराव शाळा आणि महाविद्यालय येथे मुख्याध्यापक बाबासाहेब एम्. नाईक यांना निवेदन दिल्यावर मुख्याध्यापकांनी प्रत्येक वर्गात हे निवेदन वाचून दाखवण्यास सांगितले. शाळा-महाविद्यालयात व्यसनमुक्तीच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असून माझ्या स्तरावर मी प्रयत्न करतो, तसेच तुमचे प्रयत्नही चांगले आहेत, असे सांगितले.
६. कांचनपूर हायस्कूल (तालुका मिरज) येथील मुख्याध्यापकांनी विषय समजून घेऊन शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू, असे सांगितले, तसेच कांचनपूर येथील जिल्हा परिषद शाळेत निवेदन स्वीकारल्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू, असे सांगितले. येथील धर्मप्रेमी श्री. संतोष पाटील यांनी उत्स्फूर्तपणे शाळांमध्ये जाऊन निवेदन दिले.
अन्य
सांगली शहरातील गावभाग येथील केशवनाथ मित्र मंडळ यांना निवेदन दिल्यावर त्यांनी अन्यांचे प्रबोधन करू, तसेच भीत्तीपत्रके लावू, असे सांगितले.
प्रशासन आणि पोलीस
१. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
२. ईश्वरपूर येथे तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन दिल्यावर त्यांनी बैठकीत विषय घेऊन निवेदन पोलिसांना पाठवू, असे सांगितले. या वेळी उद्योजक धर्मप्रेमी ईश्वरभाई पटेल, धर्मप्रेमी गौरव चौगुले, ओंकार पाटोळे उपस्थित होते.
३. तासगाव पोलीस ठाण्यात निवेदन स्वीकारल्यावर पोलीस उपनिरीक्षकांनी ‘तुमची मोहीम योग्य असून सर्वत्र चालू असलेले पाश्चात्त्यांचे अंधानुकरण रोखणे आवश्यक आहे’, असे सांगितले. या वेळी सोनी येथील धर्मप्रेमी प्रवीण चव्हाण, कुमठे येथील राजेंद्र माळी उपस्थित होते.
४. ईश्वरपूर येथे नगरसेविका सौ. सीमा पवार यांना निवेदन देण्यात साधना सत्संगातील जिज्ञासू आणि वाचक यांचाही सहभाग होता.