३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम !
वाराणसी – ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार रोखावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये येथे व्याख्यान देणे, राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन करणे, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देणे आदी विविध मार्गाने जागृती करण्यात आली. त्याचे संक्षिप्त वृत्त येथे देत आहोत.
सनातन संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याचा संकल्प करूया ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
अखिल भारतीय सिरवी युवा संघटनेच्या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
जोधपूर (राजस्थान) – भारतीय कालगणना सर्वश्रेष्ठ असून प्राचीन आहे. या कालगणनेमध्ये सृष्टीच्या परिवर्तनाचे प्रतिबिंब दिसते. इंग्रजी कालगणनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे आपल्याला सृष्टीशी जोडून ठेवणार्या आमच्या प्राचीन गौरवशाली कालगणनेनुसार नववर्षाचे स्वागत केले पाहिजे. त्यामुळे आपली श्रेष्ठ संस्कृती आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपले नववर्ष हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला साजरे करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक अन् ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. अखिल भारतीय सिरवी समाज युवा संघटनेच्या वतीने ‘कुटुंब ॲप’वर दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते. या बैठकीला सिरवी समाजाचे विविध राज्यांमधील ३०० हून अधिक जण उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन सूरतचे श्री. भवरलाल सिरवी जोजावर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे झाले. या वेळी श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) येथील सिरवी समाजाचे ज्येष्ठ सदस्य श्री. प्रेमचंद कोटवाल म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले कार्य करत आहात. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेली धर्मशिक्षणाविषयीची माहिती यापूर्वी आम्ही कधीच ऐकली नव्हती. या गोष्टींचा समाजामध्ये प्रसार करण्याचा निश्चित प्रयत्न करू.’’
नववर्षाचा आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चालू करा ! – अरविंद गुप्ता, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मथुरा येथील श्री राधामाधव इंटर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन
मथुरा – आज जगाच्या नकाशावर असे अनेक देश आहेत, ज्यांनी पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी न जाता स्वराष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवली आहे. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती सर्वांत प्राचीन असल्याने आपणही नववर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चालू केला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद गुप्ता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरच्या संदर्भात मथुरा येथील श्री राधामाधव इंटर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी श्री. गुप्ता बोलत होते. या कार्यक्रमाचा लाभ ८०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी घेतला. या कार्यक्रमानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. के.सी. शर्मा आणि व्यवस्थापक श्री. राकेश कुमार शर्मा यांनी प्रसन्नता व्यक्त केली.
मथुरा येथे देण्यात आले प्रशासनाला निवेदनहिंदु जनजागृती समितीच्या वतीने मथुरा येथील शहर दंडाधिकारी कार्यालय आणि होली गेट पोलीस ठाणे येथे ३१ डिसेंबर या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. |
पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथे राष्ट्र-जागृती अभियानाद्वारे करण्यात आली जनजागृती !
वाराणसी – ३१ डिसेंबरच्या रात्री होणार्या विविध अपप्रकारांवर प्रशासन आणि पोलीस यांनी प्रतिबंध घालावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील वाराणसी, सैदपूर, नटवा, जौनपूर आणि भदोही, बिहारमध्ये पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, बेतिया, तसेच झारखंडमध्ये कतरास, धनबाद अन् जमशेदपूर येथील जिल्हाधिकारी अन् पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
बिहार आणि उत्तरप्रदेश येथील शाळा अन् महाविद्यालये यांच्या प्राचार्यांना देण्यात आले निवेदन आणि करण्यात आले विद्यार्थ्यांचे प्रबोधन !
यानिमित्ताने बिहारमधील पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, गया आणि सोनपूर, तसेच उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी, भदोही अन् अयोध्या येथील १३ विद्यालयांमध्ये प्राचार्यांना निवेदन देण्यात आले, तर ६ विद्यालये आणि १ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांचे व्याख्यानाद्वारे प्रबोधन करण्यात आले.
साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गातील राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन
उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल आणि पूर्वाेत्तर भारत येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार्या साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांमधील राष्ट्रप्रेमींना ‘नववर्षाच्या निमित्त करण्यात येणार्या राष्ट्रविघातक कृत्यांविषयी’ प्रबोधन करण्यात आले.
क्षणचित्र
शाळा-महाविद्यालयांमध्ये मांडलेला विषय ठिकठिकाणचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना अतिशय आवडला.
फरिदाबाद (हरियाणा) येथे विविध पोलीस ठाणे आणि तहसीलदार यांना निवेदन
फरिदाबाद (हरियाणा) – सध्याच्या कोरोनाच्या काळात नववर्षाेत्सवाच्या नावाने राज्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि अन्य सार्वजनिक स्थळांवर होणार्या अपप्रकारांवर प्रतिबंध घालावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ डिसेंबर या दिवशी येथील सेक्टर १९, सेक्टर २८, सेक्टर ३१, एन्.आय.टी. (नवीन औद्योगिक वसाहत) क्र. ३ आणि एन्.आय.टी. ५ येथील पोलीस ठाणे, तसेच शहराचे तहसीलदार नेहा सारण यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे अधिवक्ता मोंटू सिंह आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मध्यप्रदेशमधील इंदूर, उज्जैन आणि जबलपूर येथे पोलीस अन् प्रशासन यांना देण्यात आले निवेदन !
इंदूर (मध्यप्रदेश) – ३१ डिसेंबरच्या रात्री ऐतिहासिक स्थळे आणि अन्य सार्वजनिक स्थळांवर होणार्या अपप्रकारांवर प्रतिबंध घालावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ डिसेंबर या दिवशी इंदूर येथे अपर जिल्हाधिकारी, उज्जैनमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक यांना, तर जबलपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी ‘हिंदु आर्मी’ आणि ‘टायगर फोर्स’ या संघटनांचे पदाधिकारी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अन् सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.