पुणे जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस तसेच शाळा-महाविद्यालये यांना निवेदनाद्वारे गैरप्रकार रोखण्याचे आवाहन !
हिंदु जनजागृती समितीची ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे गैरप्रकार रोखण्याविषयी मोहीम
पुणे, ३० डिसेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांना ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले, तर शाळा अन् महाविद्यालयांतून अभ्यासवर्ग आणि प्रवचन घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
वैशिष्ट्यपूर्ण
१. सौ. ज्योती जाधव यांनी त्यांच्या भागात ३१ डिसेंबरविषयी जागृती करणारा फलक स्वतः बनवून मंदिराच्या बाहेर लावला.
२. कात्रज येथील महानगरपालिकेच्या शाळेत ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर अभ्यासवर्गाची मागणी केली आहे.
३. मोहिते पाटील शाळेतील मुख्याध्यापकांनी ‘शाळेत सर्वांसाठी प्रवचन घेण्याचे नियोजन करतो’, असे सांगितले.
४. भोर येथील नायब तहसीलदार तुकाराम झाजरी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.
विशेष
पुणे जिल्ह्यात २७ प्रशासकीय कार्यालये, ८९ शाळा, २६ महाविद्यालये आणि अन्य २३ अशा एकूण १६५ ठिकाणी निवेदने दिली. १५० हून अधिक ठिकाणी फलक लेखन केले. रिक्क्षावर आणि अन्य ठिकाणी ५०० प्रबोधन पत्रके लावली. प्रबोधनात्मक बैठका १४ ठिकाणी घेतल्या. २६ ठिकाणांहून अधिक ठिकाणी हा विषय सांगितला. याचा ३ सहस्र ३०० हून अधिक जणांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. मोहिमेत ८७ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि वाचक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
पुणे पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक !
१. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी निवेदन स्वीकारतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘समाजप्रबोधनाची आवश्यकता असून तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. आपल्या मुलांवर संस्कार करणे आणि मुलांकडे लक्ष देणे, हे आईवडिलांचे दायित्व आहे. आधुनिकतेच्या नावाखाली समाज संस्कारहीन होत चालला आहे. आपण समाजप्रबोधनाचे कार्य करत आहात, हे कौतुकास्पद आहे.’’
२. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले, ‘‘प्रबोधनाची आवश्यकता आहे. शाळा आणि महाविद्यालय येथे काही साहाय्य लागले तर कळवा. आम्ही साहाय्य करू. ’’
त्यांनी ‘सनातन पंचांग २०२२’ घेतले, या पंचांगातील ‘देवतांच्या प्रतिमा पाहून मनाला पुष्कळ शांत वाटते आहे’, असेही त्यांनी सांगितले.
३. सासवड पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोलप यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर या दिवशी अनेक गैरप्रकार घडत असतात. हे रोखण्यासाठी आम्ही पोलीस प्रयत्न करत असतोच; पण तुम्हीही अशाप्रकारे जनजागृती करत आहात, हे चांगले आहे.