पोलीसदलात ५० सहस्र पदे भरणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
विधानसभा कामकाज
मुंबई, ३० डिसेंबर (वार्ता.) – सध्याची भरती पूर्ण करून नव्याने पहिल्या टप्प्यात ५ सहस्र २०० पदांची भरती चालू आहे. दुसर्या टप्प्यात ७ सहस्र पोलीस पदे भरण्याच्या संदर्भात कार्यवाही चालू आहे. राज्यातील पोलिसांचे बळ अल्प आहे. त्यामुळे आम्ही मंत्रीमंडळासमोर ५० सहस्र पदांची भरती करण्याच्या संदर्भात माहिती देऊन त्या संदर्भात निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पोलीस भरतीच्या संदर्भात सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आले होते, ते पूर्ण करण्यात आले नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ते बोलत होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, ‘‘तत्कालीन गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी ६० सहस्र पोलीस भरती करण्याची घोषणा केली होती. त्या काळात पहिल्या टप्प्यात १० सहस्र पदे भरण्यात आली. आता पुढील कार्यवाही करण्यात येईल. याचसमवेत राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलिसांनी १२ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र पोलीसदलात सेवा करता येईल. ‘होमगार्ड’मध्ये काम करणार्यांना वर्षामध्ये १८० दिवस काम देण्याचा प्रयत्न राहील.’’